लोकजनशक्ती पक्षाच्या पाच खासदारांचे बंड

पारस हे हाजीपूरचे खासदार आहेत. या बंडानंतर त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रशंसा केली.

नेतेपदी पशुपतीकुमार यांची निवड

नवी दिल्ली : बिहारमधील लोकजनशक्ती पक्षाच्या लोकसभेतील सहापैकी पाच खासदारांनी पक्षनेते चिराग पासवान यांच्याविरोधात बंड करून त्यांचे काका पशूपती कुमार पारस यांची नेतेपदी निवड केली. या बंडामुळे बिहारच्या राजकारणात उलथापालथ झाली आहे.

लोकजनशक्ती पक्षाच्या (एलजीपी) बंडखोर खासदारांनी नेतेपदी निवड केलेले पशूपतीकुमार पारस हे पक्षनेते चिराग पासवान यांचे वडील आणि लोकजनशक्ती पक्षाचे संस्थापक रामविलास पासवान यांचे धाकटे बंधू आहेत.

बंडखोर खासदारांनी नेतेपदी निवड करताच पारस यांनी ‘मी पक्ष फोडलेला नाही, तर वाचवला आहे’, अशी प्रतिक्रिया पत्रकारांकडे व्यक्त केली. पारस हे हाजीपूरचे खासदार आहेत. या बंडानंतर त्यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांची प्रशंसा केली. ‘‘नितीश कुमार हे एक चांगले नेते आणि ‘विकास पुरुष’ आहेत’’, असे ते म्हणाले. वास्तविक चिराग पासवान यांनी जनता दल (यू) आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर अनेकदा कठोर टीका केली असताना पारस यांनी त्यांच्यावर स्तुतिसुमने उधळल्यामुळे ‘एलजीपी’मध्ये फूट पडल्याचे मानले जाते. या संदर्भात ‘‘लोकजनशक्ती पक्षाच्या अध्यक्षांनी जे पेरले, त्याचेच फळ त्यांना मिळाले’’, अशी प्रतिक्रिया जद (यू)ने व्यक्त केली.

गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत चिराग पासवान यांनी ‘एलजीपी’ला जद (यू) विरुद्ध लढण्यास भाग पाडले. परिणामी, निवडणुकीत पक्षाची कामगिरी खराब झाली. त्यामुळे पक्षाचे ९९ टक्के कार्यकर्ते नाराज होते, असेही पारस म्हणाले. आपला पक्ष भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक म्हणून कायम राहील, असे सांगताना चिराग पासवान पक्षाचा भाग म्हणून राहू शकतात असेही पारस यांनी स्पष्ट केले.

‘एलजीपी’च्या पाच बंडखोर खासदारांच्या गटाने पारस यांची लोकसभेतील पक्षनेते म्हणून निवड करण्याच्या त्यांच्या निर्णयाची माहिती लोकसभा अध्यक्षांना दिली आहे.

पारस यांनी पत्रकारांशी संवाद साधल्यानंतर लगेचच चिराग त्यांना भेटण्यासाठी दिल्लीतील त्यांच्या निवासस्थानी गेले. पासवान यांचे चुलतभाऊ व खासदार प्रिन्स राज हेही या ठिकाणी राहतात. पारस आणि राज यांच्या निवासस्थानी दीड तासाहून अधिक वेळ घालवल्यानतंर चिराग पत्रकारांशी एक शब्दही न बोलता निघून गेले.

चिराग यांच्यावरील नाराजीमुळे बंडखोरी

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिन्स राज, चंदन सिंह, वीणा देवी आणि महबूब अली कैसर यांचा समावेश असलेला बंडखोर गट बऱ्याच काळापासून चिराग पासवान यांच्या कार्यशैलीवर नाराज होता. त्यांचे वडील रामविलास पासवान यांचे गेल्या वर्षी निधन झाल्यानंतर चिराग यांनी पक्षाची धुरा सांभाळली होती. आता ते अक्षरश: एकटे पडले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 5 ljp mps rebel against chirag choose pashupati kumar as leader in ls zws