दिल्लीतल्या बुराडी येथे सहा वर्षांपूर्वी एका कुटुंबातील ११ सदस्यांच्या सामूहिक मृत्यूची घटना घडली होती. या घटनेने दिल्लीसह संपूर्ण देश हादरला होता. आता तशीच एक घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे. मध्य प्रदेशच्या अलीराजपूर येथील एकाच कुटुंबातील पाच सदस्यांच्या मृत्यूचं प्रकरण समोर आलं आहे. या घरातील पाच सदस्यांचे मृतदेह छताला लटकल्याचं पाहून अलीराजपूर हादरलं आहे. पती-पत्नी आणि त्यांच्या तिन्ही मुलांचे मृतदेह घरात आढळले आहेत. या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक राजेश व्यास घटनास्थळी दाखल झाले. व्यास म्हणाले, “ही सामूहिक आत्महत्या आहे की हत्या हे एफएसएल आणि शवविच्छेदन अहवालानंतर आपल्याला समजेल.” व्यास यांच्या पाठोपाठ फॉरेन्सिक पथकही घटनास्थळी दाखल झालं असून ते पुरावे गोळा करण्याचं काम करत आहेत. सहा वर्षांपूर्वी आजच्या दिवशी (१ जुलै २०१८) बुराडी येथे एका कुटुंबातील ११ सदस्यांनी सामूहिक आत्महत्या केली होती. अलीराजपूरमधील प्रकरण त्याच घटनेची पुनरावृत्ती असल्याचं बोललं जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अलीराजपूर जिल्ह्यातील सोंडवा पोलीस ठाण्यांतर्गत रावडी गावात ही घटना घडली आहे. मृतांमध्ये कुटुंबप्रमुख राकेश, त्यांची पत्नी ललिता, मुलगी लक्ष्मी आणि दोन मुलं अक्षय व प्रकाश यांचा समावेश आहे. या कुटुंबाच्या नातेवाईकांनी ही सामूहिक आत्महत्या नसून हत्याकांड असल्याचा संशय व्यक्त केला आहे. पोलीस सध्या या प्रकरणी तपास करत आहेत.

हे ही वाचा >> पश्चिम बंगालमध्ये विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून जोडप्याला बेदम मारहाण, रस्त्यावरील ‘त्या’ कृत्यामुळे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांचाही संताप!

संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या बुराडी सामूहिक आत्महत्या प्रकरणाला आज सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. आजच्या दिवशी मध्य प्रदेशात अशीच एक घटना घडली आहे. ३० जून २०१८ रोजी रात्री ठीक १२ वाजता बुराडी येथील चुंडावत कुटुंबातील (हे कुटुंब भाटिया या नावानेही ओळखलं जात होतं.) ११ सदस्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. सुरुवातीला हे हत्याकांड असल्याचे दावे केले जात होते मात्र शवविच्छेदन अहवालानुसार या सर्वांनी आत्महत्या केल्याचं निष्पन्न झालं. कुटुंबातील सदस्यांनी एकमेकांना गळफास घेण्यास मदत केली होती. कोणाच्याही शरिरावर जबरदस्ती करण्यात आल्याचा पुरावा सापडला नव्हता. रात्री ठीक १२ वाजता या सर्व सदस्यांनी आत्महत्या केली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या घरात ११ मृतदेह सापडले. या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती ललित भाटिया यांने अंधश्रद्धा, जादूटोण्याच्या प्रभावाखाली येऊन त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आत्महत्या करण्यास भाग पाडलं असल्याचं पुढे पोलीस तपासांत उघड झालं. ललित भाटियाच्या मनोविकारामुळे ११ जणांना आपला जीव गमवावा लागला.

(बातमी अपडेट होत आहे.)

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 5 members of family hanged in madhya pradesh alirajpur same like burari suicide case asc
Show comments