Odisha Orangutan Found Wildlife Smuggling Investigation: ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यातील जंगलात पाच ओरांगउटान जातीची वानरे आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. यामुळे स्थानिक लोक आणि वन विभागाचे अधिकारी आश्चर्यचकित झाले आहेत. ओरांगउटान प्रजात इंडोनेशिया आणि मलेशियामध्ये आढळून येते. भारताच्या जंगलांमध्ये त्याचा वावर पाहायला मिळालेला नाही. त्यामुळे तब्बल ४००० किमी अंतरावरून ते ओडिशात कसे दाखल झाले? याचा शोध आता घेतला जात आहे. सध्या ओरांगउटानच्या या पाच पिलांना भुवनेश्वरच्या नंदनकानन प्राणीसंग्रहालयात वैद्यकीय देखरेखीखाली ठेवले गेले आहे.

तसेच ओडिशा सरकारने केंद्र सरकारशी संपर्क साधून या पाच ओरांगउटानच्या पिलांना राज्यातच ठेवण्यासंबंधीची परवानगी मागितली आहे. या पिलांची उंची एक ते दीड फुट असल्याचे सांगितले जाते.

ओरांगउटान पिले कुठे आढळली?

मंगळवारी पहाटे बालासोर जिल्ह्यातील बडापाई गावाजवळील जंगलात ओरांगउटानची पाच पिले आढळून आली. सकाळी ६ वाजेपर्यंत ही बातमी गावात पसरली आणि असंख्य लोक त्यांना पाहण्यासाठी गर्दी करू लागले. यानंतर वन विभागाने हस्तक्षेप करून त्यांची सुटका केली.

ज्या ठिकाणाहून ओरांगउटानची सुटका करण्यात आली. तिथे तीन सदस्यांचे विशेष कृती दल पोहोचले असून परिसरातील उपलब्ध सीसीटीव्ही फुटेजची पडताळणी आणि स्थानिकांची चौकशी केली जात आहे. विशेष कृती दलाचे प्रभारी उपमहानिरीक्षक के. व्ही. सिंह म्हणाले की, ओडिशाच्या जंगलात ओरांगउटान कसे आले? यामागे तस्करीचा पैलू आहे का? याची चौकशी केली जात आहे.

बालासोर विभागीय वन अधिकारी इंदलकर प्रतीक प्रकाश यांनी सांगितले की, आग्नेय आशियातून हा प्राणी स्वतःहून इतक्या दूर येऊ शकत नाही. त्यामुळे यामागे नक्कीच मानवी हस्तक्षेप असावा. अवैध तस्करीचा दाट संशय आहे. मात्र पोलीस त्याचा तपास करत आहेत.

एकाची किंमत २५ लाख रुपये

ओडिशाचे वन आणि पर्यावरण मंत्री गणेश राम सिंहखुंटिया यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले की, हे प्राणी भारतात आढळत नाहीत. ते मलेशिया, इंडोनेशिया, बोर्नियो आणि सुमात्राच्या वर्षावनांमध्ये दिसतात. आंतरराष्ट्रीय वन्यजीव तस्करी टोळीने त्यांना पश्चिम बंगालच्या सीमजवळ आणून बालासोरच्या जंगलात सोडले असावे, असा संशय आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात एका ओरांगउटानची किंमत २० ते २५ लाख रुपये आहे.

ओरांगउटान हे जगातील सर्वात बुद्धिमत्ता असलेल्या वानर प्रजातींपैकी एक आहेत. ते त्यांच्या आयुष्यातील बहुतेक काळ झाडांवर घालवतात. मुख्यत्वे फळे आणि इतर वनस्पती हे त्यांचे अन्न आहे.