अयोध्येतील राम मंदिराचे काम ५० टक्के पूर्ण झाले आहे. अशी माहिती उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दिली आहे. तर मंदिर ट्रस्टच्या म्हणण्यानुसार, २०२४ मध्ये मकर संक्रांतीच्या दिवशी भगवान श्रीरामाची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहात ठेवली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय २०२० मध्ये सुरू झालेले मंदिराचे काम २०२४च्या शेवटापर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

पावनधाम श्री पंचखंड पीठाच्या कार्यक्रमासाठी योगी आदित्यनाथ जयपूर येथे आले होते, यावेळी त्यांनी राम मंदिराच्या कामाबाबत माहिती दिली.

यावेळी योगी म्हणाले “श्रीराम जन्मभूमी आंदोलन १९४९ पासून सुरू झाले. १९८३ मध्ये रामजन्मभूमी समिती स्थापन झाल्यानंतर आंदोलन पुढे सरकले. संपूर्ण देशभरात या आंदोलनाला विश्व हिंदू परिषदेच्या नेतृत्वात संत, महतांनी धार दिली. खूपजण म्हणायचे की काही फायदा होणार नाही. मात्र आम्ही तर भगवान श्रीकृष्णाने सांगितलेल्या ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन’ या उपदेशावर विश्वास ठेवतो. संतांनी आपल्या आंदोलनाद्वारे हे सिद्ध केलं आणि परिणाम तर दिसरणारच होता.”

याशिवाय श्री पंचखंड पीठाने देशाच्या कल्याणासाठी विविध चळवळींमध्ये जनतेचा सहभाग वाढवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. असेही योगींनी यावेळी बोलून दाखवले.