Rohingya Boat Capsize at Bay of Bengal 500 Dead: बंगालच्या उपसागरात म्यानमारच्या रोहिंग्या अल्पसंख्याकांना घेऊन जाणाऱ्या दोन बोटी उलटल्यामुळे किमान ५०० लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. आंतरराष्ट्रीय स्थलांतरण संघटना आणि संयुक्त राष्ट्र निर्वासित उच्चायुक्तालय यांच्या एका संयुक्त निवेदनानुसार, या दोन बोटी जून महिन्याच्या अखेरीस म्यानमारच्या रखाईन प्रांतातून निघाल्या होत्या. या बोटींमध्ये प्रामुख्याने रोहिंग्या स्थलांतरितांचा समावेश होता, तसेच बांगलादेशातील निर्वासित छावण्यांमधून प्रवास करून आलेले काही जण होते.

निवेदनातील माहितीनुसार, पहिल्या बोटीत जवळपास २५० लोक होते. रखाईन प्रांतातून निघाल्यानंतर काही वेळातच बोट संपर्काबाहेर गेली. दुसरी बोट ८ जुलै रोजी प्रवासाला निघाली होती. या बोटीवर २८० लोक होते. ही बोट म्यानमारच्या इरावदी किनाऱ्याजवळ बुडाल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

संयुक्त राष्ट्रांशी संलग्न संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन बोटी बुडाल्याची माहिती मिळाली असली तरी अद्याप मृतांची संख्या समजू शकलेली नाही. मात्र मोठी जीवितहानी झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

खराब हवामानातील प्रवासावर प्रश्नचिन्ह

अलीकडच्या वर्षांत म्यानमार आणि बांगलादेशातील गर्दीने भरलेल्या निर्वासित छावण्यांमधून मोठ्या संख्येने असलेल्या रोहिंग्यांनी स्थलांतर केले आहे. मात्र ते पावसाळ्यात समुद्रमार्गे प्रवास करणे टाळतात. पावसाळ्यात खराब हवामानामुळे हा प्रवास धोकादायक बनतो. मात्र म्यानमारमध्ये सुरू असलेली हिंसा आणि बांगलादेशातील निर्वासित छावण्यांमध्ये झालेल्या गर्दीमुळे लोक आपला जीव धोक्यात घालून समुद्राचा रस्ता निवडत आहेत.

मलेशियात जाण्याचा प्रयत्न

संस्थांनी जारी केलेल्या निवेदनात पुढे म्हटले की, बोटीवरील लोकांना मलेशिया, इंडोनेशिया आणि थाइलंड या देशांत जायचे होते. तिथे त्यांना चांगले जीवनमान मिळेल, अशी अपेक्षा होती. यासाठी रोहिंग्या आणि निर्वासित छावण्यातील लोकांनी जर्जर झालेल्या लाकडाची बोट वापरली होती. या पद्धतीचा असुरक्षित प्रवास केल्यामुळे गेल्या काही वर्षांत हजारो रोहिंग्यांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यात लहान मुले, गर्भवती महिला आणि नवजात बालकांचा समावेश आहे.

कोण आहेत रोहिंग्या?

रोहिंग्या हे मूळचे म्यानमारच्या (बर्मा) रखाईन प्रांतातील रहिवासी असून मुख्यत्वे इस्लाम धर्मीय आहेत. १९८२ च्या नागरिकत्व कायद्याद्वारे म्यानमारने रोहिंग्यांचा नागरिकत्वाचा दर्जा संपुष्टात आणल्यापासून त्यांची ससेहोलपट होत आहे. म्यानमारने त्यांना देशातून हुसकावून लावण्याची मोहीम दशकभरापासून राबवली. त्यानंतर या रोहिंग्यांनी शेजारच्या बांगलादेश, भारतासह अन्य देशांचा आश्रय घेतला. बांगलादेशमध्ये ७ लाख ३० हजार रोहिंग्या असल्याचे सांगितले जाते.

UNHCR च्या मते, २०२५ मध्ये ६,५०० हून अधिक रोहिंग्यांनी समुद्राच्या मार्गाने पलायन करण्याचा प्रयत्न केला. त्यातून जवळपास ९०० जण मृत किंवा बेपत्ता झाल्याची नोंद आहे. हे वर्ष रोहिंग्यांच्या सागरी प्रवासाच्या दृष्टीने आतापर्यंतचे सर्वात प्राणघातक वर्ष ठरले.