Israel – Hamas War News in Marathi : गाझा पट्टीतील सर्वात मोठे रुग्णालय असलेल्या अल शिफा रुग्णालयाला इस्रायलने गेल्या काही दिवसांपासून लक्ष्य केलं आहे. अल शिफातील एका बोगद्यातून दहशतवादी कारवाया आणि इस्रायलच्या ओलिसांना ठेवले असल्याचा दावा इस्रायलने केला होता. त्यासाठी त्यांनी अल शिफा रुग्णालयात ऑपरेशनही राबवले. त्यांच्या या ऑपरेशनला आता पुढची दिशा मिळाली असल्याबबात इस्रायलच्या लष्कराने X पोस्ट करत माहिती दिली.
इस्रायली लष्कराने अल शिफा रुग्णालयात हल्ला चढवले आहेत. तसंच, तेथे सर्च ऑपरेशनही राबवलं. या ऑपरेशनमुळे अल शिफातील एक बोगदा सापडला असल्याचा दावा IDF ने केला आहे.




“इस्रायल डिफेन्स फोर्स आणि इंटेलिजन्स सपोर्ट एजन्सी यांच्यामार्फत राबवल्या गेलेल्या ऑपरेशननुसार, ५५ मीटर लांब आणि १० मीटर खोल असलेला दहशतवादी बोगदा शिफा रुग्णालयात सापडला आहे. या बोगद्याच्या प्रवेशद्वारावरच विविध लष्करी कारवाया करणारी यंत्रे होती. इस्रालयली लष्कराला रोखण्यासाठी येथे ब्लास्टप्रुफ दरवाजा, फायरिंग होल सारख्या सुरक्षा यंत्रणाही होत्या”, असंही IDF ने X पोस्टवर म्हटलं आहे.
हेही वाचा>> गाझातील शिफा रुग्णालयातून ३० नवजात बालकांना हलवले; उपचारांसाठी इजिप्तला पाठवण्याची शक्यता
“गेल्या चार आठवड्यांपासून आम्ही सांगत आहोत की, गाझातील नागरिक आणि अल शिफा रुग्णालयातील रुग्णांना हमासने मानवी ढाल म्हणून वापलं आहे आणि हा त्याचा पुरावा आहे”, असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
“हा दरवाजा हमास दहशतवादी संघटनेद्वारे इस्रायली सैन्याला कमांड सेंटर्समध्ये आणि हमासच्या भूमिगत मालमत्तेत प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी वापरला जातो”, असे लष्करी निवेदनात म्हटले आहे. परंतु, या दरवाजापलिकडे काय आहे, याबाबत स्पष्टता करण्यात आलेली नाही.
अल शिफा रुग्णालयाखाली बोगदा सापडल्यानंतर याबाबत हमासने स्पष्टीकरण दिलं आहे. संपूर्ण पॅलेस्टिनी एन्क्लेव्हमध्ये शेकडो किलोमीटरचे गुप्त बोगदे, बंकर आणि ऍक्सेस शाफ्टचे जाळे आहेत. या रुग्णालयातील हा बोगदाही नागरी पायाभूत सविधेपैकी एक आहे.
गाझातील शिफा रुग्णालयातून ३० नवजात बालकांना हलवले
गाझातील सर्वात मोठ्या शिफा रुग्णालयातून मुदतपूर्व जन्म झालेल्या तीस शिशूंना हलवण्यात आले असून त्यांना इजिप्तमधील रुग्णालयांमध्ये ठेवण्यात येईल, असे गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे. याच वेळी, इस्रायली फौजांनी इतर रुग्णांना हलवण्याची मुभा दिल्यानंतर, या रुग्णालयात २५९ रुग्ण उरले असल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या चमूने रविवारी सांगितले. या उर्वरित रुग्णांमध्ये अत्यंत गंभीर स्थितीतील, तीव्र संसर्गित जखमांच्या वेदना असलेले रुग्ण, तसेच हालचाल करण्यास असमर्थ असलेल्या पाठीच्या कण्याला इजा झालेल्या रुग्णांचा समावेश आहे.