IndiGo flights :…म्हणून ५५ टक्के इंडिगो विमानांचे उशीराने उड्डाण; ‘डीजीसीए’ चौकशी करणार

विमान वाहतूक नियामकाने इंडिगोकडून स्पष्टीकरण देखील मागितले आहे

indigo
(संग्रहीत छायाचित्र)

देशभरातील अनेक इंडिगो विमानांच्या उड्डाणांना क्रू मेंबर्सच्या अनुपलब्धतेमुळे विलंब झाला, अशी बातमी एएनआय या वृत्तसंस्थेने रविवारी दिली. शनिवारी, इंडिगोची ५५ टक्के देशांतर्गत उड्डाणे उशीराने झाली. कारण मोठ्या संख्येने केबिन क्रू सदस्यांनी आजारी रजा घेतलेली होती. तर सूत्रांकडून असेही सांगितले जात आहे की, ते इंडियाच्या भरती मोहिमेसाठी गेले होते.

इंडिगो एअरलाइन्सच्या उड्डाणांना मोठा विलंब होत आहे. ज्याची नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने तीव्र दखल घेतली. विमान वाहतूक नियामकाने इंडिगोकडून स्पष्टीकरण देखील मागितले आहे. डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेला माहिती दिली आहे. इंडिगोची दररोज सुमारे १६०० उड्डाणे होतात. मात्र क्रू मेंबर्स उपलब्ध नसल्यामुळे शनिवारी ९०० उड्डाणांना विलंब झाला होता. तर, “आम्ही याकडे लक्ष देत आहोत.” असं डीजीसीएचे प्रमुख अरुण कुमार यांनी सांगितलेलं आहे.

ईटी नाऊ वरील अहवालानुसार, सामान्य उड्डाण विलंब होत असल्याने इंडिगोला आतापर्यंतच्या सर्वात वाईट कामगिरीच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. तथापि, या प्रकरणावर इंडिगो एअरलाइन कडून कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण जारी करण्यात आलेले नाही. एअर इंडियाच्या भरती मोहिमेचा दुसरा टप्पा शनिवारी आयोजित करण्यात आला होता आणि इंडिगोच्या बहुतेक केबिन क्रू सदस्यांनी आजारी रजा घेतलेली होती, त्यामुळे सदस्य या भरती मोहिमेस गेले असण्याची देखील शक्यता वर्तवली जात आहे.

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, शनिवारी इंडिगोची ४५.२ टक्के देशांतर्गत उड्डाणे वेळेवर चालली. त्या तुलनेत शनिवारी एअर इंडिया, स्पाइसजेट, व्हिस्तारा, गो फर्स्ट आणि एअरएशिया इंडियाची ऑन टाइम कामगिरी अनुक्रमे ७७.१ टक्के, ८०.४ टक्के, ८६.३ टक्के, ८८ टक्के आणि ९२.३ टक्के होती.

दरम्यान,इंडिगोच्या विमानांना उशीर झाल्याने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या समस्या मांडल्या.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 55 percent indigo domestic flights delayed dgca to probe msr

Next Story
“शिवसेना म्हणजे युक्रेन नाही, असा कोणताही गट शिवसेनेला ताब्यात घेऊ शकत नाही”
फोटो गॅलरी