देशातील ५५ राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपत आहे. १७ राज्यांतून आलेल्या या सदस्यांच्या रिक्त होणाऱ्या जागांवर निवडणुका घेण्यासाठी निवडणूक आयोगानं तारखा जाहीर केल्या आहेत. निवडणूक प्रक्रिया ६ मार्चपासून सुरू होणार आहे. २६ मार्च रोजी यासाठी बॅलेट पेपरच्या माध्यमातून मतदान होईल. याच दिवशी सायंकाळी ५ वाजता निकाल घोषित केला जाणार आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक ७, तामिळनाडूच्या ६ आणि पश्चिम बंगालच्या ५ जागांवर ही निवडणूक होणार आहे.

निवडणूक आयोगाने केलेल्या घोषणेनुसार, ६ मार्च रोजीपासून अर्ज करता येईल. अर्ज करण्याची अंतिम तारिख १३ मार्च असेल. त्यानंतर १६ मार्च रोजी छाननी केली जाईल. १८ मार्चपर्यंत उमेदवार आपले अर्ज मागे घेऊ शकतील.

 

राज्यसभेतील ६८  जागा यावर्षी रिक्त होणार आहेत. यात काँग्रेस आणखी काही जागा गमावणार असल्याने सभागृहातील विरोधकांचे संख्याबळ आणखी कमी होणार आहे. रिकाम्या होणाऱ्या १९ पैकी सुमारे ९ जागा काँग्रेस गमावू शकते. प्रियंका गांधी वढेरा, ज्योतिरादित्य शिंदे आणि रणदीप सुरजेवाला यांच्यासह काही बडय़ा नेत्यांना वरिष्ठ सभागृहात आणण्याचा काँग्रेस विचार करत असल्याची चर्चा आहे.

स्वबळावर ९ जागा जिंकण्याचा आणि मित्रपक्षांच्या मदतीने एखादीदुसरी जागा जिंकण्याचा काँग्रेसला विश्वास आहे. हा पक्ष जेथे सत्तेवर आहे, त्या छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थानमध्ये पक्षाच्या जागा काही प्रमाणात वाढतील असा अंदाज आहे.

यावर्षी एप्रिल, जून व नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांनंतर राज्यसभेत सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडी बहुमताच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. राज्यसभेतील ५१ जागा यावर्षी एप्रिलमध्ये, आणखी ५ जागा जूनमध्ये, तर ११ जागा नोव्हेंबरमध्ये रिकाम्या होणार आहेत.