पाकव्याप्त काश्मीरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानचा पाठिंबा असलेल्या दहशतवादी गटांच्या जवळपास ५५ छावण्या गेल्या चार महिन्यांत उभारण्यात आल्या आहेत. या छावण्यांमध्ये दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन त्यांना जम्मू-काश्मीरमध्ये पाठविण्यात येते, असे मंगळवारी अधिकाऱ्यांनी सांगितले.

गुप्तचर यंत्रणेच्या अहवालाचा हवाला देऊन सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले की, किमान २० नव्या छावण्या उभारण्यात आल्या आहेत. यापूर्वी त्या परिसरात ३५ छावण्या होत्या. आता ५५ छावण्या आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

भारतीय लष्कराने गेल्या सप्टेंबर महिन्यांत प्रत्यक्ष नियंत्रण रेषा ओलांडून लक्ष्यभेदी कारवाई केली तेव्हा दहशतवाद्यांच्या ३५ छावण्या होत्या. कारवाईनंतर त्या तेथून हलविण्यात आल्या आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये अन्यत्र नेण्यात आल्या. मात्र जानेवारी महिन्यापासून या छावण्या पुन्हा उभारण्यात आल्या असून किमान २० नव्या छावण्या अस्तित्वात आल्या आहेत, असे अधिकारी म्हणाला.या सर्व म्हणजे ५५ छावण्या सक्रिय आहेत. या वर्षी पहिल्या चार महिन्यांत घुसखोरीचे ६० प्रयत्न झाले . सध्या काश्मीर खोऱ्यात जवळपास १६० दहशतवादी सक्रिय आहेत, असे गुप्तचर यंत्रणांच्या हवाल्याने अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.