कानपूरमधील शेल्टर होममधील मुलींची सध्या करोना चाचणी करण्यात येत आहे. स्वरूप नगर येथील बालिका संरक्षण गृहमधील ५७ अल्पवयीन मुलींना करोनाचा संसर्ग झाला आहे. या शेल्टर होममधील सात मुली प्रेग्नंट असल्याचेही समोर आले आहे. या सात मुलींपैकी पाच मुलींना करोनाचा संसर्ग झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गर्भवती मुलींपैकी एक मुलगी 8 महिन्यांची आणि दुसरी साडे आठ महिन्यांची गरोदर आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. करोना व्हायरसचा संसर्ग झालेल्या सर्व ५७ मुलींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्याची माहिती जिलाधिकारी बी.आर तिवारी यांनी दिली आहे.


स्वरूप नगर येथील बालिका संरक्षण गृहामधील सर्व कर्मचाऱ्यांना क्वारंटाइन करण्यात आलं असून शेल्टर होम सध्या सील करण्यात आले आहे. तसेच त्या सातही मुली येथील वस्तीग्रहात येण्याआधीच गर्भवती होत्या. त्या पाच करोनाबाधित मुली या आग्रा, एटा, कन्नौज, फिरोजाबाद आणि कानपूरच्या बाल कल्याण समितीच्या परवानगीनंतर इथं राहत होत्या. तसेच त्यांना पोक्सो कायद्यांतर्गत येथे आणलं होतं, असेही तिवारी म्हणाले.

सरकारी वस्तीगृहात घडलेल्या या प्रकरावर कानपूर येथील डीएम यांनी ट्वीट करत अफवा पसरवणाऱ्यापासून सावध राहण्याचं आवाहन केलं आहे. ते म्हणाले की, ‘काहीजण चुकीच्या हेतूनं कानपूर शेल्टर होमबाबत खोटी माहिती पसरवत आहेत. सध्याच्या परिस्थितीत अशी माहिती पसरवणं असंवेदनशीलतेचे उदाहरण आहे. कृपया कोणतीही दिशाभूल करणारी माहिती तपासल्याशिवाय पोस्ट करू नका. जिल्हा प्रशासन यासंदर्भात आवश्यक त्या कारवाईसाठी सातत्याने माहिती गोळा करत आहे.’