मेक्सिकोला गुरूवारी भूकंपाचा तीव्र झटका बसला. या भूकंपामुळे ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती अमेरिकेच्या भूगर्भीय सर्वेक्षण संस्थेने दिली. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ८.१ एवढी नोंदविण्यात आली. भूकंपामुळे कमी तीव्रतेचे त्सुनामी वादळही आले. ज्यामुळे आलेल्या लाटांनी काही इमारतींचे नुकसान केले. १९८५ मध्ये जो भूकंप मेक्सिकोत आला होता त्यावेळी हजारो लोकांचा मृत्यू झाला होता. गुरूवारी झालेल्या भूकंपामुळे मेक्सिकोतील नागरिकांना १९८५ च्या त्या भूकंपाची आठवण झाली. ‘रॉयटर्स’ या वृत्तसंस्थेने या संदर्भातील माहिती दिली आहे.

मेक्सिकोतील पिजिजियापन शहरात भूकंपाची तीव्रता सर्वाधिक आहे. या ठिकाणी जमीन दुभंगल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पिजिजियापनपासून १२३ किलोमीटर अंतरावर  या भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. समुद्राजवळच हा भूकंप आल्याने त्सुतामीचा धोका अजूनही संपलेला नाही. मेक्सिकोतील पिजिजियापन आणि चिआपास या दोन शहरांना भूकंपाचा सर्वात जास्त फटका बसला आहे. मेक्सिकोत भूकंपामुळे अनेक इमारतींचे नुकसान झाले आहे.

भूकंपाचे तीव्र झटके जाणवल्याने नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. हेलिकॉप्टरच्या आधारे किती नुकसान झाले याची पाहणी करण्यात आली. अनेक लोकांनी भूकंपाचे तीव्र झटके जाणवल्याने घराबाहेरच थांबण्याचा पर्याय निवडला आहे. भूकंप आणि वादळी वारा यामुळे वातावरणात थंडावा निर्माण झाला आहे. काहींनी अंगावर चादर गुंडाळून बाहेर थांबायचे ठरवले आहे. लहान मुले काय झाले हे कळू न शकल्याने रडत आहेत.

आमच्यासाठी हा धक्कादायक अनुभव होता आणि संपूर्ण इमारतच खाली पडेल की काय? अशी भीती आम्हाला वाटली, अशी प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली. सुरूवातीला काय होते आहे ते समजले नाही त्यामुळे हसू आले, मात्र वीज गेली आणि आता काय होणार ते कळतच नव्हते, मग मात्र मी घाबरून गेलो अशी प्रतिक्रिया लुइस कार्लोस या ३१ वर्षीय नागरिकाने दिली. मेक्सिकोत १९८५ नंतर आलेला हा सर्वात मोठा भूंकप आहे.