सुमारे ६० विदेशी दहशतवादी गेल्या महिनाभरात जम्मू- काश्मीरमध्ये घुसले असल्याची माहिती ३ सरकारी अधिकाऱ्यांनी दिली आहे.

मात्र स्थानिक युवकांची दहशतवादी गटांमध्ये भरतीचे प्रमाण आतापर्यंतचे सर्वात कमी प्रमाण असल्याचा दावा जम्मू- काश्मीरचे पोलीस महासंचालक दिलबाग सिंह यांनी केला. गेल्या ४५ दिवसांत फक्त दोघेजण दहशतवादी गटांमध्ये सामील झाले असल्याचे ते म्हणाले.

लष्कर आणि सीमा सुरक्षा दल यांच्यासह अनेक यंत्रणांनी केलेल्या मूल्यमापनानंतर घुसखोरी केलेल्या परदेशी दहशतवाद्यांची संख्या निश्चित करण्यात आल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

दहशतवाद्यांच्या श्रीनगरमधील आणि इतर ठिकाणच्या हालचालींकडे सरक्षा यंत्रणा अतिशय काळजीपूर्वक लक्ष देत आहेत. स्थानिक गावकऱ्यांना धमकावण्यासाठी दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार केल्याच्या घटना श्रीनगरमध्ये घडल्या असल्याचे एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.

काश्मीर खोऱ्यात, तसेच नियंत्रण रेषेलगतच्या भागात मोबाईल दूरध्वनी सेवा अद्याप बंदच ठेवण्यात आल्यामुळे दहशतवादी गटांचे स्थानिक वाहक पाकिस्तानमधील त्यांच्या सूत्रधारांना फोन करण्यासाठी पंजाबमध्ये जात आहेत, अशी माहिती आणखी एका अधिकाऱ्याने दिली.

पंजाबमधून पाकिस्तानातील सूत्रधारांना करण्यात आलेले काही कॉल्स आम्ही पकडले आणि त्याच्या पाश्र्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था आवळण्यात आली आहे. शक्य तितक्या जास्त दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचा पाकिस्तान प्रयत्न करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे २७ सप्टेंबरला संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेला संबोधित करणार असून, त्यापूर्वी मोठे हल्ले घडवून आणण्याचे प्रयत्न केले जातील, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.