Antique Coins Fraud : सध्या वेगवेगळ्या प्रकारे सायबर फसवणूक केली जाण्याचे प्रकार सर्वत्र पाहायला मिळत आहेत. मध्यप्रदेशमध्ये एका ६५ वर्षीय व्यक्तीबरोबर देखील असाच प्रकार घडला आहे. रेवा शहरात एका निवृत्त सुरक्षारक्षकाने स्वत:वर बंदुकीने गोळी झाडून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. सरोज दुबे असे या व्यक्तीचे नाव असून त्याने एका पुरातन नाण्याच्या बदल्यात कोट्यवधी रुपये देण्याचे आश्वासन ऐकून जवळपास ६० हजार रुपये एका फसवणूक करणाऱ्या व्यक्तीच्या खात्यात जमा केले. पण जेव्हा काही काळाने त्यांचा लक्षात आले की आपण फसवले गेलो आहोत. दरम्यान फसवणूक करणारा व्यक्तीच्या सततच्या मागण्या आणि धमक्यांना कंटाळून त्यांनी ४ जुलै रोजी स्वतःचे जीवन संपवले.

रेवा येथे झालेला हा नाणे घोटाळ्यात आत्महत्या होण्याचे पहिलीच घटना असल्याचे मानले जात आहे. मउगंज जिल्ह्यात गेल्या वर्षी एका महिलेने अशाच प्रकारच्या फसवणुकीनंतर आत्महत्या केली होती.

१ जुलै रोजी श्री दुबे यांना एका अनोळखी नंबरवरून फोन आला तेव्हापासून या प्रकरणाला सुरूवात झाली. फोन करणाऱ्याने स्वतःची ओळख करून देताना आपण ‘इंडियन ओल्ड कंपनी’चा प्रतिनिधी असल्याचे सांगितले आणि दावा केला की सरकार डेकोरेटिव्हा आणि हेरिटेज साठी प्राचीन नाणी खरेदी करत आहे. दुबे यांच्याकडेही बहुतांश जणांकडे असतात तशी काही जुनी नाणी आणि नोटा होत्या. त्यामुळे दुबे यांना ६५.७५ लाख रुपये मिळणार असल्याचा दावा करणारे प्रमामपत्र त्यांना पाठवण्यात आले. त्यांनी त्यांच्याकडील नाण्यांचे फोटो फसवणूक करणाऱ्यांना पाठवले. त्यानंतर रिफंडेबल असलेल ५२० रुपये प्रोसेसिंग फी पाठवायला सांगण्यात आली.

दुबे यांनी लगेच ही रक्कम पाठवून दिली, त्यानंतर फसवमणूकीची व्याप्ती वाढतच गेली. पुढील दोन दिवसांत दुबे यांना व्हॉट्सअॅपवर सतत मेसेज पाठवण्यात आले, ज्यामध्ये वेगवेगळी प्रमाणपत्रे पाठवण्यात आली, ऑडिओ रेकॉर्डिंग्स, त्यांना पाठवण्यासाठी बॅगेत नोटा भरल्या जात असल्याचे व्हिडीओ पाठवण्यात आले. २ जुलै पर्यंत दुबे यांनी मित्रांकडून आणि नातेवाईकांकडून कर्ज घेऊन सहा वेळा ३७,००० रुपये हस्तांतरित केले.

नेमकं काय झालं?

३ जुलै रोजी आरोपींनी सुरक्षा म्हणून अतिरिक्त १०,००० रुपयांची मागणी केली. जेव्हा दुबे यांनी टाळाटाळ केली, तेव्हा त्यांनी व्यवहार रद्द करण्याची आणि त्यांनी आधी दिलेले पैसे परत न करण्याची धमकी दिली. शेवटी कोणताही पर्याय नसल्याने त्यांनी त्यांच्या जावयाशी संपर्क साधून अधिक पैसे मागितले. परंतु काहीतरी गडबड असल्याचे लक्षात आल्याने दुबे यांच्या पत्नी निर्मला यांनी आधीच कुटुंबातील इतरांना सावध केले होते . जावई आणि मुलीने मदत करण्यास नकार दिला आणि पोलिसांना या प्रकरणाची तक्रार करण्याचा सल्ला दिला. पण दुबे तेथून निघून गेले आणि त्यांचे म्हणणे होते की त्यांना २ कोटी रुपये मिळणार आहेत आणि यासाटी त्यांचे कुटुंबच त्यांना पाठिंबा देत नाही.

फसवणूक करणाऱ्यांनी दुबे यांना पाठवण्यासाठी पैशांचे बंडल बॉक्समध्ये भरले जात असल्याचे अनेक व्हिडीओ पाठवले होते. अखेर दुबे यांनी फोन उचलने बंद केले आणि त्यांच्या घराच्या समोर असलेल्या एका अडगळीच्या खोलीत स्वतःला बंद करून घेतले. या खोलीत त्यांची परवाना असलेली रिव्हॉल्वर देखील होती, ही बंदुक त्यांचे वडील माजी तहसीलदार मुन्नी लाल दुबे यांची होती.

त्यांचा बराच शोध घेतल्यानंतर ४ जुलै रोजी कुटुंबाला दुबे यांचा मृतदेह आढळून आला, त्यांचा अर्धा चेहरा गोळी लागल्याने उडून गेला होता. त्यांनी परवानाधारक शस्त्राचा वापर करुन त्याचे आयुष्य संपवले होते. पोलिस अधीक्षक विवेक सिंग यांनी सांगितलं की, सुरुवातीच्या तपासात असे दिसून आले आहे की दुबे एका नाणे घोटाळ्यात अडकले होते आणि त्यांना वारंवार आर्थिक आणि मानसिक धक्के सहन करावे लागले. पण फसवणूक करणाऱ्यांच्या मागण्या काही थांबल्या नाहीत.

त्यांना सांगण्यात आले ही जर त्यांनी आणखी १०,००० दिले नाहीत तर प्रोसेस रद्द होऊ शकते. तसेच त्यांनी आधी भरलेले पैसे देखील परत केले जाणार नाहीत, असे दुबे यांच्या पत्नीने सांगितले. दुबे त्यांना पैसे परत करण्याची विनंती करत राहिले पण ते आणखी पैसे मागत राहिले, असेही त्या म्हणाल्या.

क्रूरतेचा कळस

इतकेच नाही तर दुबे यांच्या मृत्यूनंतरही फसवणूक करणारे निर्लज्जपणे त्यांच्या पत्नीला फोन करत राहिले. त्यांनी मला ५,५०० रुपये देण्यास सांगितले – ते म्हणाले की ते पैसे घेऊन आमच्या घराबाहेर आले होते. मी बाहेर आले तेव्हा कोणीही नव्हते, असे निर्मला म्हणाल्या. “मी त्यांना सांगितले, माझ्या पतीचा तुमच्यामुळे मृत्यू झाला आहे. त्यावर ते म्हणाले, मग आम्ही तुम्हाला पैसे देऊ.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेवाचे पोलिस अधीक्षक विवेक सिंग यांनी एनडीटीव्हीला माहिती देताना सांगितले की, सायबर फसवणूक आणि आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. “प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे की पीडिताला जुन्या नाण्यांच्या बदल्यात कोट्यवधी रुपयांचे आमिष दाखवून फसवण्यात आले होते. पैशांचे अनेक व्यवहार करण्यात आले. जेव्हा मागणी वाढतच गेली तेव्हा पीडिताला लक्षात आले की त्याला फसवले गेले आहे आणि त्याने अखेर हे टोकाचे पाऊल उचलले,” असे सिंह म्हणाले. दुबे यांचा मोबाईल फोन आणि पेमेंट ट्रेल मिळवला असून बँक खाती आणि आयपी एड्रेस यांचा शोध घेतला जात आहे, असेही एसपी म्हणाले.