पाकिस्तानच्या ताब्यात ६८२ भारतीय नागरिक

पाकिस्तानच्या कारागृहांत ६८२ भारतीय कैदी असून, भारताच्या ताब्यात ४६१ पाकिस्तानी कैदी आहेत.

pakistan-flag
संग्रहित छायाचित्र

इस्लामाबाद : पाकिस्तानच्या कारागृहांत ६८२ भारतीय कैदी असून, भारताच्या ताब्यात ४६१ पाकिस्तानी कैदी आहेत. परदेशी उच्चायुक्तालयांतील समन्वयाच्या २००८ च्या करारानुसार भारत आणि पाकिस्तानदरम्यान परस्परांच्या ताब्यात असलेल्या या देशांच्या नागरिक आणि मच्छीमारांच्या यादीची देवाणघेवाण होते. 

 पाकिस्तानने भारतीय उच्चायुक्तालयाला त्यांच्या ताब्यातील ६८२ भारतीय कैद्यांची यादी दिली. त्यात ६३३ मच्छीमार आहेत. भारतानेही पाकिस्तानला आपल्या ताब्यातील ४६१ पाकिस्तानी कैद्यांची यादी दिली. त्यात ११६ मच्छीमार आहेत.  २१ मे २००८ रोजी भारत-पाकिस्तानात झालेल्या ‘कॉन्स्युलर अ‍ॅक्सेस अ‍ॅग्रीमेंट’नुसार यादींची ही देवाणघेवाण होते. भारताने पाकिस्तानला ५३६ भारतीय मच्छीमार व तीन भारतीय नागरिकांच्या कैदेची मुदत संपल्याने त्यांची मुक्तता करण्याचे आवाहन केले आहे.  पाकिस्तानच्या ताब्यातील १०५ मच्छीमार आणि २० नागरिक भारतीय असण्याची शक्यता असल्याने त्यांच्याशी  संपर्क साधण्याची मुभा भारतीय दूतावासाला द्यावी. कैदेची मुदत संपलेल्या भारतीय नागरिक, संरक्षण दलातील  व्यक्ती आणि मच्छीमारांना मूक्त करावे,  असे आवाहन भारतीय परराष्ट्र विभागाने पाकिस्तानला केले आहे.

भारताचे आवाहन

दोन्ही देशांतील कैदी आणि मच्छीमारांचा प्रश्न मानवतावादी दृष्टिकोनातून सोडवण्यास भारत कटिबद्ध आहे. भारताने आपल्या ताब्यातील मच्छीमारांसह ५७ कैद्यांच्या पाकिस्तानी नागरिकत्वास दुजोरा देण्यासंबंधीची कारवाई करण्यास पाकिस्तान सरकारला आवाहन केले आहे. त्याशिवाय त्यांची मुक्ततेची कारवाई रखडली असल्याचेही भारतीय परराष्ट्र विभागाने नमूद केले आहे.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: 682 indian nationals in pakistan custody pakistani prisoner ysh

Next Story
नूपुर शर्मा यांच्यामुळेच वणवा; सर्वोच्च न्यायालयाचे गंभीर ताशेरे, सर्व गुन्हे एकत्र करण्याची याचिका फेटाळली
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी