68th annual Grammy Awards winner Dalai Lama: जगाला शांतता आणि अहिंसेची शिकवण देणारे तिबेटी धर्मगुरू दलाई लामा यांनी वयाच्या ९० व्या वर्षी ग्रॅमी पुरस्कार जिंकला आहे. संगीत आणि कलेच्या जगातील सर्वात मोठ्या व्यासपीठावर त्यांनी हा पुरस्कार मिळवला आहे. अमेरिकेतील लॉस एंजेलिस या शहरात पार पडलेल्या ६८ व्या वार्षिक ग्रॅमी पुरस्कार समारंभात दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दलाई लामा हे तिबेटी बौद्ध धर्मातील सर्वोच्च आध्यात्मिक नेते आहेत. ‘दलाई लामा’ या शब्दाचा अर्थ ‘ज्ञानाचा महासागर’ असा होतो. सध्याचे दलाई लामा हे १४ वे दलाई लामा आहेत. त्यांचे नाव तेन्झिन ग्यात्सो (Tenzin Gyatso) असे आहे. नेमक्या कोणत्या श्रेणीत दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे ते जाणून घेऊया…

कोणत्या श्रेणीत दलाई लामा यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला?

दलाई लामा यांना ‘सर्वोत्तम ऑडिओ बुक, कथन आणि कथाकथन रेकॉर्डिंग’ या श्रेणीत हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या अल्बममध्ये ध्यानाचे सखोल बारकावे आणि जीवनातील त्यांचे अनुभव मांडले आहेत. विशेष म्हणजे, पुरस्कारामुळे ते या वर्षी पहिल्यांदाच ग्रॅमी जिंकणाऱ्या प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक स्टीवन स्पीलबर्ग आणि के-पॉप स्टार्सच्या यादीत सामील झाले आहेत.

दलाई लामांचा प्रवास

६ जुलै १९३५ रोजी तिबेटमधील एका छोट्या गावात दलाई लामा यांचा जन्म झाला. अवघ्या दोन वर्षांचे असतानाच त्यांची तिबेटमधील सर्वोच्च आध्यात्मिक गुरू म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मानवतेच्या सेवेसाठी आणि शांततेचा संदेश जगभर पोहोचवण्यासाठी समर्पित केले. तिबेटचा प्रश्न हिंसाचार न करता, शांततेच्या मार्गाने सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेल्या प्रयत्नांबद्दल १९८९ मध्ये त्यांना नोबेल शांती पुरस्काराने गौरवण्यात आले. आता ग्रॅमी पुरस्कार मिळाल्यामुळे त्यांच्या जागतिक पातळीवरील ओळख आणि प्रभाव आणखी वाढणार आहे.

‘शांतीचा विजय’

संगीत क्षेत्रातील ‘ऑस्कर’ म्हणून ओळखले जाणारे ग्रॅमी पुरस्कार रेकॉर्डिंग अकादमीकडून कलाकारांच्या उत्कृष्ट कार्याची दखल घेण्यासाठी प्रदान केले जातात. दलाई लामा यांच्या या यशातून हे स्पष्ट होते की त्यांचा शांती आणि करुणेचा संदेश धर्म व राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांपर्यंत पोहोचतो. विशेष म्हणजे आजची तरुण पिढी आणि कलाप्रेमीही त्यांच्या विचारांशी मनापासून जोडलेले आहेत.

जगभरातील त्यांचे लाखो अनुयायी या यशाचे ऐतिहासिक क्षण म्हणून स्वागत करत आहेत. सोशल मीडियावर अनेक जण याला ‘शांतीचा विजय’ असे संबोधत आहेत. त्यांच्या अल्बमचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे मानसिक आणि आंतरिक शांततेवर दिलेला भर आहे हे दिसून येते.