Suicide Bomber Targets Wedding Ceremony in Pakistan : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात शुक्रवारी एका लग्न समारंभात एका आत्मघातकी हल्ल्यात सातजण ठार झाले असून २५ जण जखमी आहेत. लग्न समारंभात आलेल्या एका पाहुण्याने त्याच्या जॅकेटमधून हा आत्मघातकी बॉम्ब आणला होता. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

डेरा इस्माईल खान जिल्ह्यातील सरकार समर्थक समुदाय नेते नूर आलम मेहसूद यांच्या निवासस्थानी हा हल्ला झाला, असं स्थानिक पोलिसांनी सांगितले. लग्नसमारंभातच हा स्फोट झाल्याने पाहुण्यांचे धावपळ झाली. ठिकठिकाणी मृतांच्या शरीराचे अवशेष पडले असून भरमंडपात रक्ताचे पाट वाहिले आहेत. दरम्यान, याप्रकरणाची पुढील चौकशी सुरू असून लग्नात आलेल्या सर्वांची ओळख पटवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

छप्पर कोसळल्याने अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले

पाहुणे लग्नसमारंभात बेभान नाचत होते, तेवढ्यातच हा हल्ला झाला. यामुळे छप्पर कोसळले. यामुळे बचावकार्यात अडथळा निर्माण झाला. छप्पर कोसळल्यामुळे ढिगाऱ्याखाली लोक अडकले होते. पोलिसांनी सांगितले की, मृत आणि जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनेक जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे वृत्त आहे. सुरक्षा कर्मचाऱ्यांनी परिसराला वेढा घातला आहे आणि ओळख पटवण्यासाठी शोध मोहीम सुरू केली आहे, असे वृत्त एजन्सी एपीने दिले आहे.

तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानवर संशय

प्राथमिक अहवालानुसार, शांतता समितीचा नेता वहीदुल्ला मेहसूद उर्फ ​​जिगरी मेहसूद याचा मृतांमध्ये समावेश आहे. या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कोणत्याही गटाने स्वीकारलेली नाही. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान (टीटीपी) या आत्मघातकी बॉम्बस्फोटामागे असल्याचा संशय आहे. अलिकडच्या काळात या संघटनेने पाकिस्तानमध्ये असंख्य हल्ले केले आहेत. या महिन्याच्या सुरुवातीला, खैबर पख्तूनख्वाच्या बन्नू जिल्ह्यात सशस्त्र हल्लेखोरांनी शांतता समितीच्या चार सदस्यांची हत्या केली होती. नोव्हेंबर २०२५ मध्ये, त्याच प्रांतात शांतता समितीच्या कार्यालयावर हल्ला झाला तेव्हा सात लोक ठार झाले होते.