ऑईल टँकर्सपासून सावधान! मथुरेत विचित्र अपघातात ७ जण जागीच ठार!

मथुरेजवळ झालेल्या भीषण अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

tanker collided with car in mathura accident

रस्त्यांवरून वेगाने जाणारे मोठमोठाले ट्रॅक्टर, ट्रॉली किंवा कंटेनर्सच्या बाजूने जाताना अनेकांच्या काळजात धडकी भरते. आणि त्याला कारणही तसंच आहे. या कंटेनर्स किंवा टँकर्समध्ये असलेल्या वजनामुळे चालकाचं थोडं जरी नियंत्रण सुटलं, तरी ही अवजड वाहनं पलटी होण्याची शक्यता असते. किंवा ही वाहनं नियंत्रणाबाहेर जाऊ शकतात. उत्तर प्रदेशच्या मथुरेमध्ये यमुना एक्स्प्रेस वेवर असाच काहीसा प्रकार घडला आहे. या विचित्र अशा अपघातामध्ये ७ जण जागीच ठार झाल्याची घटना मंगळवारी मध्यरात्री उशिरा घडली आहे. त्यामध्ये एकाच कुटुंबातल्या किमान ५ जणांचा समावेश असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

कसा घडला अपघात?

मथुरेचे वरीष्ठ पोलीस अधीक्षक गौरव ग्रोवर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मध्यरात्री उशिरा मथुरेहून आग्र्याच्या दिशेने एक ऑईल टँकर वेगाने जात होता. यावेळी टँकरच्या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि टँकर रस्त्याच्या डिव्हायडरच्या दिशेने वळला. असं काही होईल, याची कोणतीही शक्यता वाटत नसलेली एक कार मागच्या बाजूने टँकर आणि डिव्हायडरच्या मधून पुढे जात होती. मात्र, तितक्याच बाजूचा टँकर वळला आणि टँकर आणि डिव्हायडरमध्ये ही कार सापडली.

या भीषण अपघातात कारमध्ये बसलेल्या सर्व कुटुंबीयांसह एकूण ७ जण जागीच ठार झाले असल्याची माहिती मिळाली आहे. यामध्ये एक पुरुष, त्याची पत्नी, त्याची दोन मुले, त्यांचे दोन नातेवाईक आणि कारचालकाचा समावेश आहे. हे सर्वजण हरियाणाच्या जिंदचे रहिवासी होते. मथुरेमध्ये धार्मिक स्थळाला भेट देण्यासाठी ते जात होते. दरम्यान, ट्रकचालकाविषयी अद्याप निश्चित माहिती मिळू शकलेली नाही.

काय सांगते आकडेवारी?

२०२० हे वर्ष भारतासाठी रस्ते अपघातांच्या दृष्टीने काहीसं शांत होतं. कारण या वर्षात लॉकडाऊनमुळे रस्ते अपघातांच्या संख्येत कमालीची घट झाल्याचं पाहायला मिळालं. मात्र, २०२१मध्ये लॉकडाऊन उघडताच रस्ते अपघातांमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. सर्व राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांनी सर्वोच्च न्यायालायाच्या समितीला एका प्रकरणासंदर्भात पुरवलेल्या माहितीनुसार २०२०च्या एप्रिल ते जूनदरम्यान म्हणजेच, लॉकडाऊन असताना भारतात २० हजार ७३२ जणांचा अपघातामध्ये मृत्यू झाला होता. हा आकडा २०१९मध्ये तब्बल ४१ हजार ०३२ इतका होता.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: 7 people killed in road accident in mathura on yamuna express way pmw