Ayatollah Ali Khamenei इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांना अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त कारवाई करत ठार केलं. त्याच्या हत्येनंतर इराणमध्ये चाळीस दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला होता. दरम्यान त्यांच्या मृत्यूला सात आठवडे उलटून गेले आहेत तरीही अयातुल्ला खामेनी यांच्या पार्थिवावर अद्याप अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार यामागे सुरक्षेशी संबंधित कारणं असू शकतात.
खामेनींच्या अंत्ययात्रेत इस्रायलच्या हल्ल्याची भीती?
अयातुल्ला खामेनी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करायचे ठरवले आणि प्रेतयात्रेत जर का इस्रायलने हल्ला केला तर अनेक लोकांचा जीव जाऊ शकतो. खामेनी यांना अखेरचा निरोप देण्यासाठी लोक मोठ्या प्रमाणावर घराबाहेर पडतील. अशावेळी इस्रायलकडून मोठा हल्ला केला जाऊ शकतो अशी भीती इराणला आहे. तसंच इराणच्या सुरक्षा अधिकाऱ्यांचं हे म्हणणं आहे की खामेनी यांच्या अंत्ययात्रेसाठी लाखो लोक जमले तर प्रत्येकाला सुरक्षा पुरवणं हे जवळपास अशक्य असेल.

शासनामधील अंतर्गत असंतोष
फाऊंडेशन फॉर डिफेन्स ऑफ डेमोक्रेसिजचे विशेष तज्ज्ञ बेहनम तालेब्लू यांचं म्हणणं आहे की अयातुल्ला खामेनी यांच्या मृतदेहावर अजूनही अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. कारण तेहरानमध्ये असुरक्षितता आहे. तसंच जोखीम उचलण्याची सरकारची मानसिकता नाही. इराण सरकारला फक्त बाहेरुन होणाऱ्या हल्ल्यांची चिंता आहे असं नाही तर शोकसभेत सरकारच्या विरोधात निदर्शनं होतील अशीही चिंता आहे. तसंच सरकारच्या काही विभागांमध्ये मतभेद आहेत त्यामुळे याबाबतचा निर्णय अद्याप घेतला गेलेला नाही. अयातुल्ला खामेनी हे मोजतबा खामेनींचे वडील होते. जर अयातुल्ला खामेनी यांच्या दफनविधीसाठी मोजतबा खामेनी उपस्थित राहू शकणार नसतील तर त्यांना त्याबाबत स्पष्टीकरण द्यावं लागेल. इराणमध्ये मागील ५० दिवसांपासून इंटरनेट सेवा बंद आहे. सत्य समोर येईल अशी भीती इराणला वाटते आहे. त्यामुळे खामेनी यांच्या मृतदेहावर अद्याप अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत अशी माहिती तालेब्लू यांनी दिली. NDTV ने हे वृत्त दिलं आहे.
मोजतबा खामेनींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह
अयातुल्ला खामेनी यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत याचं आणखी एक कारण म्हणजे मोजतबा खामेनी यांना असलेला विरोध आणि ते कुठे आहेत याबाबत न मिळालेली माहिती. मोजतबा खामेनी हे अयातुल्ला खामेनी यांच्यानंतर प्रमुख झाले. मात्र ते कुठे आहेत आणि कसे आहेत याबाबत कुठलीही ठोस अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांच्या निधनानंतर मोजतबा खामेनी यांची या पदावर नियुक्ती करण्यात आली. त्यानंतर त्यांनी एकदाही देशाला संबोधित केलेलं नाही. ते सुखरुप आहेत असा कुठलाही फोटोही समोर आलेला नाही. अमेरिकेने हा दावा केला आहे की मोजतबा खामेनी जखमी झाले आहेत आणि त्यांची प्रकृती मोठ्या प्रमाणावर बिघडली आहे. रशियात त्यांचे उपचार सुरु आहेत अशीही एक महिती समोर आली होती. मात्र इराणने अद्याप कुठलीही अधिकृत माहिती दिलेली नाही. त्यामुळे सर्वोच्च नेत्याबाबतच लोकांच्या मनात प्रश्न आहेत.

इराणला नेमकी कसली भीती वाटते आहे?
८६ वर्षीय अयातुल्ला खामेनी यांना २८ फेब्रुवारी रोजी अमेरिका आणि इस्रायलने संयुक्त कारवाई करत ठार केलं. १९८९ मध्ये अयातुल्ला रुहोल्लाह खोमेनी यांचं निधन झालं होतं त्यावेळी स्टेट फ्युनरलचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांच्या अंत्ययात्रेत लाखो लोक सहभागी झाले होते. आता पुन्हा एकदा अशीच परिस्थिती ओढवली आणि गर्दीवर जर इस्रायलने हल्ला केला तर पुन्हा एकदा इराणला हल्ल्याला तोंड द्यावं लागेल ही भीतीही इराणला आहे. तेहरानच्या ऐवजी मशहद शहरात अयातुल्ला खामेनींना अखेरचा निरोप दिला जाईल अशी शक्यता होती. त्यासाठी १ मार्च ते ४ मार्च असा राजकीय दुखवटा आणि नंतर अंत्यसंस्कार करण्यात येतील असंही ठरल्याची माहिती समोर आली होती. मात्र अद्याप अयातुल्ला खामेनींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आलेले नाहीत. अजूनही कुठल्या तारखा जाहीर न होणं यावरुन इराणमध्ये अंतर्गत पेचप्रसंग निर्माण झाला आहे असंच दिसून येत आहे.
अयातुल्ला अली खामेनी कोण होते?
अयातुल्ला अली खामेनी यांचा जन्म १९३९ साली इराणच्या उत्तरेकडील मशहद शहरात झाला. ते आठ भावंडांपैकी दुसरे होते. त्यांचे वडील एक धर्मगुरू होते आणि त्यांची कौटुंबिक परिस्थिती सर्वसामान्य होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत खामेनी यांनी धर्मशास्त्राचे शिक्षण घेतले. १९५८ ते १९६४ दरम्यान त्यांनी कोम येथे धार्मिक अध्ययन केले आणि १९६२ साली अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांच्या शाहविरोधी चळवळीत ते सहभागी झाले. शाहच्या राजवटीदरम्यान त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला. १९७९ च्या इस्लामी क्रांतीनंतर ते प्रमुख नेत्यांपैकी एक म्हणून उदयास आले. १९८१ ते १९८९ या काळात त्यांनी इराणचे राष्ट्रपती म्हणून काम पाहिले आणि इराण-इराक युद्धाच्या काळात देशाचे नेतृत्व केले. १९८९ साली अयातुल्ला खोमेनी यांच्या निधनानंतर खामेनी यांनी सर्वोच्च नेतेपद स्वीकारलं होतं.
