अफगाणिस्तानमध्ये सत्ता ताब्यात घेणाऱ्या आणि सरकार स्थापन करणाऱ्या तालिबानने शिक्षणासंदर्भात जारी केलेला नवीन आदेश हा चक्रावून टाकणारा आहे. काबुल विद्यापीठाचे पीएचडी पदवी असणारे कुलगुरु मुहम्मद उस्मान बाबरी यांना पदावरुन हटवण्यात आलं आहे. त्यांच्या जागी बीएपर्यंत शिक्षण घेतलेल्या मुहम्मद अशरफ घैरट यांना कुलगुरु करण्यात येत असल्याची घोषणा तालिबानने केलीय. या निर्णयाला विरोध करण्यासाठी काबुल विद्यापीठातील ७० शिक्षकांनी राजीनामा दिलाय.

घैरट यांना कुलगुरु केल्याबद्दल विद्यापिठातील कर्मचारी आणि शिक्षकांमध्ये नाराजी असून विद्यार्थ्यांनीही यासंदर्भात सोशल नेटवर्किंगवरुन नाराजी व्यक्त केलीय. टीकाकारांनी केलेल्या टीकेमध्ये यापूर्वी घैरट यांनी पत्रकारांच्या हत्या या योग्य असल्याचं म्हटलं होतं ही आठवण करुन दिलीय. अशा विचारसरणीची व्यक्ती कुलगुरुपदी असणं शैक्षणिक दृष्ट्या धोकादायक असल्याचं टीकाकारांचं म्हणणं आहे.

खासा प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार अनुभवी पीएचडी पदवीधारकाऐवजी बीएपर्यंत शिक्षण झालेल्या व्यक्तीला देशातील सर्वात नामांकित विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्त केल्याने लोकांनी नाराजी व्यक्त केलीय. घैरट मागील सरकारच्या कार्यकाळामध्ये शिक्षणमंत्री होते. तसेच ते अफगाणिस्तानच्या दक्षिण आणि पश्चिमेतील आईईए विद्यापीठांच्या मानांकन समितीचे प्रमुख सुद्धा होते.

सोमवारीच तालिबानने एक नामांतरणाची घोषणा केलीय. माजी अफगाणी राष्ट्राध्यक्ष आणि अफगाणिस्तानमधील दुसऱ्या सर्वात मोठ्या राजकीय दलाचे संस्थापक असणाऱ्या बुरहानुद्दीन रब्बानी यांच्या नावे असणाऱ्या विद्यापीठाचं नाव बदलण्यात आलं आहे. २००९ पासून बुरहानुद्दीन रब्बानी यांच्या नावाने हे विद्यापीठ ओळखळं जायचं. २००९ साली रब्बानी यांच्या घरावर झालेल्या हल्ल्यामध्ये त्यांचा मृत्यू झाल्यानंतर हे नामकरण करण्यात आलेलं. मात्र आता तालिबानची सत्ता असणाऱ्या सरकारच्या उच्च शिक्षण मंत्रलायने जारी केलेल्या निर्देशानुसार विद्यापीठे ही देशातील बौद्धिक संपदा असून त्यांची नावं राजकीय नेत्यांच्या नावे ठेवता येणार नाही असं सांगत नाव बदलण्याचा निर्णय घेतलाय.