सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टअंतर्गत नव्या संसदेचं आणि परिसरातील बांधकाम सध्या सुरु आहे. यामध्ये पंतप्रधान आणि उपराष्ट्रपती यांच्या निवासस्थानासहित अनेक नवे कार्यालय भवन आणि मंत्रालयाच्या कार्यालयांसाठी केंद्रीय सचिवालय उभारलं जात आहे.

यादरम्यान दिल्लीमधील डलहौसी रोडवर स्थित संरक्षण मंत्रालयाशी संबंधित अनेक अधिकाऱ्यांची कार्यालयं पंतप्रधानांच्या निवासस्थानासाठी हटवली जात आहेत. पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थानासाठी आणि कार्यालय उभारण्यासाठी तेथून ७०० हून अधिक कार्यालयांना हटवण्यात आलं आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, मंत्रालयातील जवळपास सात हजार अधिकाऱ्यांना दिल्लीमधील कस्तुरबा गांधी मार्ग आणि चाणक्यपुरीजवळ अफ्रीका अव्हेन्यू येथील कार्यालयांमध्ये शिफ्ट केलं जाणार आहे.

रिपोर्टनुसार, संरक्षण मंत्रालयाची कार्यालयं हटवण्यात आल्याने साऊथ ब्लॉकजवळ ५० एकर जमीन उपलब्ध झाली आहे. याचा वापर सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्टमधील एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्हसाठी (Executive Enclave) होणार आहे. या ठिकाणी पंतप्रधान निवासस्थानासोबत वरिष्ठ अधिकाऱ्यांचीही कार्यालयं असणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या हस्ते येथे उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.

एका वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, डलहौसी रोडवर स्थित सर्व कार्यालयं पुढील दोन महिन्यात रिकामी करुन नव्या जागी शिफ्ट होतील. २७ वेगवेगळ्या संस्थांमधील सात हजार कर्मचारी यावेळी शिफ्ट होतील असंही त्यांनी सांगितलं आहे. यामध्ये संरक्षण मंत्रालयाची संलग्न कार्यालये, सेवा मुख्यालय आणि इतर अधीनस्थ कार्यालयांचा समावेश आहे.

चाणक्यपुरीमधील अफ्रिका अव्हेन्यू येथे संरक्षम मंत्रालय कॉम्प्लेक्स सात मजली इमारत असून येथे फक्त संरक्षण मंत्रालयाचं कार्यालय असणार आहे. तर इतर कार्यालयं मध्य दिल्लीत स्थित आठ मजली इमारतीत असतील.