scorecardresearch

उत्तर प्रदेशात हिंसाचार; चार शेतकऱ्यांसह आठ ठार; आंदोलकांच्या जथ्यात मोटार घुसवल्याचा आरोप

या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. हा नरसंहार असून, शेतकऱ्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही,

उत्तर प्रदेशात हिंसाचार; चार शेतकऱ्यांसह आठ ठार; आंदोलकांच्या जथ्यात मोटार घुसवल्याचा आरोप

लखीमपूर खेरी : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्य़ातील टिकोनिया येथे शेतकरी आंदोलनादरम्यान रविवारी हिंसाचार घडला. त्यात आठजण ठार झाले, तर अनेकजण जखमी झाले. मृतांमध्ये चार शेतकऱ्यांचा समावेश आहे.

केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा यांच्या बनवीरपूर गावात ही घटना घडली. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य हे एका कार्यक्रमासाठी गावात येणार होते. मौर्य यांच्या विरोधात निदर्शने करण्यासाठी जमलेल्या कृषी कायदेविरोधी शेतकरी आंदोलकांवर कथितरीत्या दोन मोटारी घुसवल्यानंतर हिंसाचार घडला. आंदोलकांनी या दोन मोटारींना आग लावल्याचाही आरोप करण्यात येत आहे.

या हिंसाचारात चार शेतकरी आणि अन्य चार जण ठार झाल्याचे लखीमपूर खेरीचे जिल्हाधिकारी अरविंद कुमार चौरासिया यांनी सांगितले. या घटनेत शेतकरी नेते ताजिंदर सिंग विर्क जखमी झाले आहेत, अशी माहिती भारतीय किसान मोर्चाच्या नेत्यांनी दिली. घटनास्थळी एका वाहनात मिश्रा यांचा मुलगा होता, असा आरोप शेतकऱ्यांनी केला. मात्र, मिश्रा यांनी हा आरोप फेटाळला. या हिंसाचारात भाजपचे तीन कार्यकर्ते आणि एका वाहनचालकाचा मृत्यू झाल्याचे मिश्रा यांनी सांगितले.

या घटनेचे राजकीय वर्तुळात तीव्र पडसाद उमटले आहेत. हा नरसंहार असून, शेतकऱ्यांचे बलिदान वाया जाऊ देणार नाही, अशी प्रतिक्रिया कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी व्यक्त केली. समाजवादी पक्ष, राजदसह अन्य पक्षांनीही या घटनेवरून भाजप सरकारला लक्ष्य केले आहे. या घटनेनंतर शेतकरी नेते राकेश टिकैत रविवारी गाझिपूरहून लखीमपूर खेरीकडे गेले.

काय घडले?

केंद्रीय गृहराज्यमंत्री मिश्रा यांच्या बनवीरपूर या मूळ गावात काही विकासकामांचा शुभारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य उपस्थित राहणार होते. ज्या हेलिपॅडवर त्यांचे हेलिकॉप्टर उतरणार होते, तेथेच सकाळपासून शेतकऱ्यांनी काळे झेंडे घेऊन धरणे धरले होते. समजूत काढूनही ते तेथून हलण्यास तयार नव्हते. तेथे शेतकऱ्यांच्या जमावात दोन मोटारी घुसल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर हिंसाचार घडला. 

आज देशभर निदर्शने

लखीमपूर खेरी घटनेच्या निषेधार्थ आज, सोमवारी देशातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येतील, अशी घोषणा संयुक्त किसान मोर्चाने केली. या घटनेची उत्तर प्रदेश प्रशासनाकडून नव्हे, तर सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही संयुक्त किसान मोर्चाने केली आहे. काँग्रेसनेही या घटनेच्या न्यायालयीन चौकशीची मागणी केली आहे.

खट्टर यांच्या चित्रफितीने वाद

* चंडीगड: हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर वादात सापडले आहेत. हरयाणाच्या उत्तर-पश्चिम जिल्ह्य़ात ठिकठिकाणी कार्यकर्ते उभे करा, जशास तसे उत्तर द्या.

* तुरुंगात गेल्यावर मोठे नेते व्हाल, असे विधान त्यांनी भाजप किसान मोर्चाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत बोलताना केल्याची चित्रफीत प्रसारित झाली आहे.

* रविवारी निवासस्थानी जमलेल्या कार्यकर्त्यांपुढे खट्टर यांनी केलेले हे वक्तव्य समाजमाध्यमांवर पसरल्याने वाद सुरू झाला आहे. काँग्रेसने खट्टर यांच्यावर टीकास्त्र सोडले. * एखादा मुख्यमंत्रीच हिंसाचाराला प्रोत्साहन देत असेल तर घटनेनुसार राज्य कसे चालणार, असा सवाल काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी उपस्थित केला.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-10-2021 at 03:14 IST

संबंधित बातम्या