उना (गुजरात) : गुजरातच्या गीर सोमनाथ जिल्ह्य़ाच्या उना तालुक्यात समुद्रकिनाऱ्याजवळ नांगरून ठेवलेल्या बोटी रात्रभरात नष्ट होऊन बुडाल्यानंतर किमान आठ मच्छीमार बेपत्ता आहेत, असे अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

बेपत्ता मच्छीमारांच्या शोधासाठी तटरक्षक दलाच्या हेलिकॉप्टरच्या मदतीने गुरुवारी सकाळपासून बचाव मोहीम हाती घेण्यात आल्याचे उना तालुक्याचे महसूल अधिकारी आर.आर. खांभरा यांनी सांगितले.

वादळी वातावरणामुळे किनाऱ्यावर नांगरलेल्या किमान १० बोटी पूर्णपणे नष्ट झाल्या, तर इतर ४० बोटींचे अंशत: नुकसान झाले, असा दावा स्थानिकांनी केला. ‘जोरदार वारे आणि समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा यांमुळे नवाबंदर खेडय़ात समुद्र खवळला. आधी १२ मच्छीमारांचा शोध लागत नव्हता, मात्र त्यापैकी चौघे पोहून किनाऱ्यावर परतू शकले, तर आठ जण अद्याप बेपत्ता आहेत. तटरक्षक दलाने पाठवलेल्या हेलिकॉप्टरच्या मदतीने बचावकार्य सुरू केले आहे,’ असे खांभरा म्हणाले.

वातावरणात अचानक झालेल्या बदलामुळे जोरदार वारे व लाटा यांनी मध्यरात्रीच्या सुमारास किनाऱ्याला धडक दिली, तेव्हा मच्छीमार त्यांच्या नांगरलेल्या बोटीत झोपले होते. मध्यरात्रीनंतर वादळासारखी परिस्थिती निर्माण झाली. खवळलेल्या वातावरणामुळे बोटी बुडाल्याने आठ मच्छीमार बेपत्ता असल्याचे नवाबंदरचे सरपंचांनी सांगितले.