संयुक्त राष्ट्रांनी आठ भारतीयांसह १०६ शांतिरक्षक सैनिकांचा मरणोत्तर पदक देऊन गौरव केला. शांतिरक्षक सेना कायम ठेवणे हा काही देशातील अस्थिरतेवरचा उपाय नाही, तर तेथील राजकीय स्थिती सुधारण्यासाठी सुरक्षा मंडळाने राजकीय स्थिती सुधारण्याची गरज आहे असे मत भारताने व्यक्त केले.
आंतरराष्ट्रीय संयुक्त राष्ट्रे शांतिसेनादिनानिमित्त गुरुवारी सरचिटणीस बान की मून यांच्या उपस्थितीत कार्यक्रम झाला. त्यांनी वेगवेगळय़ा मोहिमेत प्राणार्पण करणाऱ्या शांतिसैनिकांच्या स्मारकाजवळ जाऊन श्रद्धांजली वाहिली.
संयुक्त राष्ट्रातील राजदूत स्थायी सदस्य अशोककुमार मुकर्जी व इतर दूत या वेळी उपस्थित होते. बान की मून यांनी संयुक्त राष्ट्रांचे द्वितीय प्रमुख डॅग हॅमरसकोल्ड यांच्या नावाने ठेवण्यात आलेले पदक १०६ जवानांना मरणोत्तर प्रदान केले.
मुकर्जी यांनी धारतीर्थी पडलेल्या आठ भारतीय जवानांच्या वतीने मरणोत्तर पदक स्वीकारले. ले. कर्नल महीपाल सिंग, लान्स नायक नंदकिशोर जोशी, हवालदार हीरा लाल, नायब सुभेदार शिवकुमार पाल, हवालदार भारत सासमल यांचा गेल्या वर्षी एप्रिलमध्ये सुदानमधील मोहिमेत मृत्यू झाला होता. त्यांच्यावर २०० जणांनी हल्ला केला. त्यात त्यांना वीरमरण आले होते. सुभेदार धर्मेश संगवान व सुभेदार कुमार पाल सिंग यांचा गेल्या वर्षी अकोबो येथे संयुक्त राष्ट्रांच्या तळावरीलहल्ल्यात मृत्यू झाला होता, तर फेब्रुवारी २०१३ मध्ये काँगो प्रजासत्ताकात झालेल्या हल्ल्यात शिपाई रामेश्वर सिंग यांचा मृत्यू झाला होता. सैनिकांच्या स्मृतिस्तंभाजवळ मेणबत्त्या प्रज्वलित करण्यात आल्या होत्या.