छत्तीसगढमध्ये पोलिसांशी झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे. मंगळवारी सकाळी छत्तीसगढ आणि तेलंगणाच्या सीमेवरील घनदाट जंगलाच्या भागात पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाईमध्ये तेलंगणा, छत्तीसगढचे पोलीस आणि केंद्रीय निमलष्करी दलाचे जवानही सहभागी झाले होते.
बीजापूर जिल्ह्यातील पामेद पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चेर्ला गावाजवळी मंगळवारी सकाळी पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. नक्षल्यांच्या हालचालींबाबत माहिती मिळाल्यावर संयुक्तपणे पोलिसांनी ही कारवाई केली. नक्षल्यांना सुरुवातीला शरण येण्यास सांगण्यात आले होते. पण त्यांनी पोलिसांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करीत त्यांच्यावर थेट गोळीबार करण्यास सुरुवात केली. याला पोलिसांकडूनही लगेचच प्रत्युत्तर देण्यात आले. याच चकमकीत आठ नक्षलवादी मृत्युमुखी पडले. त्यांची ओळख अजून पटलेली नाही.