Parliament Budget Session 2026 : राहुल गांधी यांनी लोकसभेत माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित पुस्तकातील उल्लेखावरून सत्ताधाऱ्यांना घाम फोडलेला असताना आज अमेरिकेबरोबर भारताने व्यापार करार केल्यावरून राहुल गांधींनी आवाज उठवला. या प्रश्नी राहुल गांधींचं समर्थन करणाऱ्या खासदारांनाच निलंबित करण्यात आलं आहे. लोकसभेने आज विरोधी पक्षातील आठ खासदारांना निलंबित केलं आहे. या खासदारांनी लोकसभेत कागदपत्रे भिरकावली असल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, आज दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलं आहे. तसंच, निलंबित करण्यात आलेल्या आठ खासदारांमध्ये महाराष्ट्रातील एका खासदाराचाही समावेश आहे.

निलंबित केलेल्या ८ सदस्यांमध्ये गुरजीत औजला, हिबी एडन, माणिकम टागोर, प्रशांत यादराव पडोळे, किरण कुमार रेड्डी, डीन कुरियाकोसे, अमरिंदर सिंग राजा वारिंग आणि एस. वेंकटेशन यांचा समावेश आहे. लोकसभेतील पीठासीन अधिकारी दिलीप सैकिया यांच्यावर कागदपत्रे फेकून मारल्याने या घटनेचा विरोध केला. संसदीय शिष्टाचाराचा भंग असल्याचं म्हणत अर्थसंकल्पीय अधिवेशनात अशा कृती सहन केल्या जाणार नाहीत, असंही त्यांनी म्हटलंय. त्यामुळे आठ खासदारांना उर्वरित अर्थसंकल्पाकरता निलंबित करण्यात आलं आहे.

“संसदेत का बोलू दिलं जात नाही, यावर विरोधी पक्षनेने राहुल गांधी यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. पंतप्रधानांनी अमेरिकेसमोर ज्या प्रकारची शरणागती पत्करली आहे, व्यापार करार कसा झाला आणि व्यापार करारात घडलेल्या संशयास्पद गोष्टींमुळे हे घडले आहे. एपस्टाईन ही अशी गोष्ट आहे ज्यावर संसदेत चर्चा व्हायला हवी, परंतु या सर्व गोष्टींवर चर्चा झालेली नाही. आम्ही सभागृहाच्या आत आणि बाहेर आमचा निषेध सुरू ठेवू. आमचे आठ खासदार निलंबित आहेत, परंतु आम्ही संसदेच्या आत आणि बाहेर आमचा लढा सुरू ठेवू”, असं निलंबित करण्यात आल्यानंतर खासदार हिबी एडन म्हणाले.

जनतेच्या हक्कासाठी फासावरही जाऊ

“जनतेच्या हक्कासाठी जे लढतात त्यांना गायब केलं जातं किंवा निलंबित केलं जातं. जनतेच्या प्रश्नावर सरकार बोलत नाही. राहुल गांधींनी विचारलं आहे की इतर देश काही करत असेल तर आपण काय केलं पाहिजे. पण त्यांचा आवाज दडपवण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे त्यांच्या समर्थनार्थ उभे राहू. जनतेच्या हितासाठी मी फाशीवरही जायला तयार आहे”, असं खासदार प्रशांत पाडोळे म्हणाले.

राहुल गांधींनी केला निषेध

लोकसभेतील ८ खासदारांच्या निलंबनाविरोधात आणि भारत-अमेरिका व्यापार कराराच्या विरोधात लोकसभा खासदार राहुल गांधी, प्रियंका गांधी वड्रा आणि इतर खासदारांसह काँग्रेस खासदारांनी संसदेच्या मकर द्वार येथे निदर्शने केली.

काँग्रेस खासदार प्रियंका गांधी वड्रा यांनी लोकसभेतून पक्षाच्या आठ खासदारांच्या निलंबनावर टीका केली. त्या म्हणाल्या, “हे हास्यास्पद आहे. लोकशाहीत प्रत्येक सदस्याला बोलण्याचा अधिकार असला पाहिजे आणि त्यांचे प्रश्न ऐकले पाहिजेत.”