करोनाच्या पार्श्वभूमीवर जगभरात, तसंच देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. लॉकडाउनमुळे अर्थव्यवस्थेचं चक्रही बंद झालं आहे. सध्या भारतात लॉकडाउनचा तिसरा टप्पा सुरू करण्यात आला आहे. शनिवारी केंद्र सरकारनं लॉकडाउनचा कालावधी दोन आठवड्यांनी वाढवल्याची घोषणा केली होती. तसंच लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्यात ग्रीन, रेड आणि ऑरेंज झोनमध्ये अनेक बाबतीत सशर्त सुट देण्याची घोषणाही केली होती. अशा परिस्थितीत अनेक ठिकाणी पैशाची कमतरता, कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात किंवा कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यासारखे प्रकार सुरू आहेत. दरम्यान, यामुळे ८६ टक्के भारतीयांना आपली नोकरी गमावण्याची चिंता सतावत असल्याची माहिती एका सर्वेक्षणातून समोर आली आहे.

करोना व्हायरसच्या संकटामुळे अनेकांना आपली नोकरी आणि उपजीविकेचं साधण गमावण्याची चिता सतावत आहे. ब्रिटिश रिसर्च फर्म ‘क्रॉस्बी टेक्सटर ग्रुप’नं केलेल्या सर्वेक्षणातून ही बाब समोर आली आहे. ‘क्रॉस्बी टेक्सटर ग्रुप’नं २३ एप्रिल ते २७ एप्रिलदरम्यान भारत, अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया आणि हाँगकाँगमध्ये सर्वेक्षण केलं होतं. मनी कंट्रोलनं पीटीआयच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. सर्वेक्षणात सहभागी असलेल्या ८४ टक्के लोकांच्या मानण्यानुसार सध्या करोना व्हायरसचं संकट सुरूवातीच्या टप्प्यात आहे आणि ते वेगानं वाढत आहे. तर ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या लोकांनी करोना व्हायरसचं संकट अखेरच्या टप्प्याकडे येत असल्याचं म्हटलं. तर करोना व्हायरसचं संकट पूर्वीपेक्षा नियंत्रणात असल्याचं मत हाँगकाँगच्या नागरिकांनी व्यक्त केलं.

भारतीयांना नोकरीची चिंता

सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ८६ टक्के भारतीयांना आपल्या नोकरीची चिंता असल्याची माहिती समोर आली आहे. तर या तुलनेत ब्रिटनमधील ३१, ऑस्ट्रेलियातील ३३ तर अमेरिकेतील ४१ आणि हाँगकाँगमधील ७१ टक्के लोकांना नोकरी गमावण्याची चिंता सतावत आहे.