बुधवारी दिल्लीत शाळा पुन्हा उघडण्यात आल्या आहेत. देशातील अनेक राज्यांमध्ये आधीच शाळा उघडण्यात आल्या आहेत. त्यावरुन आता प्रशासनाच्या या निर्णयावर तज्ज्ञ, विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांमध्ये वाद सुरू झाला आहे. करोना लस अद्याप मुलांसाठी आलेली नाही, त्यामुळे कदाचित शाळा उघडण्याचा हा योग्य निर्णय नाही असे काही पालकांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे, एम्सचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी लहान मुलांच्या लसीकरणाबाबत आणि शाळा उघडण्याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.

ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, नवी दिल्लीचे संचालक डॉ रणदीप गुलेरिया यांनी बुधवारी इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत लहान मुलांच्या लसीकरणाबाबत माहिती दिली आहे. “भारतातील सर्व मुलांचे लसीकरण करण्यासाठी नऊ महिन्यांचा कालावधी लागेल. त्यामुळे पुढील वर्षाच्या मध्यापर्यंत शाळा बंद ठेवता येणार नाहीत,” असे गुलेरिया म्हणाले. याव्यतिरिक्त, डॉ गुलेरिया म्हणाले की ते शाळा पुन्हा उघडण्याच्या समर्थनात आहेत कारण मुलांसाठी शारीरिक संवाद महत्त्वपूर्ण आहे.

“शाळांमधील सर्व कर्मचारी सदस्यांना लसीकरण केले पाहिजे आणि दुपारच्या जेवणाच्या सुट्टीत आणि शाळेच्या आवारात किंवा बाहेर पडत असताना विद्यार्थ्यांची गर्दी टाळण्यासाठी पावले उचलली पाहिजेत. जर शाळांमध्ये जास्त प्रकरणे नोंदवली गेली असतील तर त्या बंद केल्या पाहिजेत,” असे गुलेरिया यांनी म्हटले आहे.

“केरळमध्ये शाळा उघडू नका. दिल्लीसारख्या भागात जिथे रुग्णसंख्येचे प्रमाण कमी आहे तिथे शाळा सुरु करता येऊ शकतात. दिल्लीत शाळा उघडण्यासाठी सध्या सर्वोत्तम वेळ आहे. अनेक मुलांना ऑनलाईन शिक्षण घेण्याचा पर्याय नाही. खर्च आणि मिळत असलेले शिक्षण पाहता शाळा उघडण्याचेच जास्त फायद्याचे आहे, ” असे डॉ रणदीप गुलेरिया यांनी सांगितले.

राज्यांनी लहान मुलांसाठीही शाळा उघडल्या पाहिजेत का, असे विचारले असता डॉ. गुलेरिया म्हणाले की, “लहान मुले करोनापासून सुरक्षित असल्याने त्यांनी तसे करावे. भारत बायोटेक सप्टेंबरच्या अखेरीस मुलांसाठी कोव्हॅक्सिनच्या वापरासाठी नियामक मंजुरीसाठी अर्ज करेल. त्यानंतर या महिन्यात मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.”

राज्यातील स्थिती..

राज्यातील आठवी ते दहावीचे वर्ग २७ जुलैपासून सुरू करण्यात आले. सध्या राज्यातील १२ हजार ७२५ शाळा सुरू करण्यात आल्या असून तेथे साधारण साडेदहा टक्के  उपस्थिती आहे. मुंबई, नागपूर, औरंगाबाद, रायगड, रत्नागिरी, सातारा, नगर, उस्मानाबाद, लातूर या जिल्ह्य़ांमध्ये शाळा सुरू झाल्या नाहीत.