एका सरकारी शाळेत नऊ शिक्षक आणि मुख्याध्यापकाने मिळून चार विद्यार्थीनींवर बलात्कार आणि विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजस्थानमधील अलवर जिल्ह्यात नऊ शिक्षक आणि सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पीडित मुलीच्या वडिलांनी शाळेत का जात नाही, अशी विचारणा केल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. १० वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने आरोप केला की तिच्या शाळेच्या मुख्याध्यापक आणि इतर तीन शिक्षकांनी एक वर्षभर तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. तसेच दोन महिला शिक्षकांवर या कृत्याचा व्हिडिओ काढल्याचा आरोपही या पीडितेने केला आहे.

या प्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, असे मानधना पोलीस स्टेशनचे अधिकारी मुकेश यादव यांनी सांगितले. पोलीस तपासादरम्यान, सहावी, चौथी आणि तिसरीमध्ये शिकणाऱ्या आणखी तीन पीडित मुली पुढे आल्या आणि त्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकांवर सामूहिक बलात्काराचा आरोप केला. या घटनेबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही आरोपींनी दिल्याचे पीडितांनी सांगितले. यासंदर्भात इंडिया टुडेने वृत्त दिलंय.

“आम्ही ही बाब महिला शिक्षकांना सांगितल्यावर त्यांनी आम्हाला फी माफ करण्याचं आणि पुस्तकं देण्याचं आमिष दाखवलं. तसेच याप्रकरणी कोणाकडेही तक्रार करू नका, असेही शिक्षकांनी सांगितले.” असा आरोप एका पीडितेनं केलाय.

दरम्यान, एका पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, जेव्हा ते या घटनेची तक्रार शिक्षिकेकडे करण्यासाठी शाळेत गेले तेव्हा मुख्याध्यापकांनी आपला भाऊ मंत्री असल्याचे सांगितले.”त्याने मला सांगितले की मी तक्रार केली तर तो मला मारून टाकेल.” तर, दुसरीकडे मुख्याध्यापकाने सर्व आरोप फेटाळून लावले असून अशा कोणत्याही प्रकाराची आपल्याचा माहिती नसल्याचं सांगितलं.