दिल्लीत तिसरीमध्ये शिकणाऱ्या ९ वर्षांच्या मुलीचा कार्डिअॅक अरेस्टमुळे मृत्यू झाला आहे. ही विद्यार्थिनी लव्हली हेरिटेज स्कूल या ठिकाणी शिकत होती. मयुर विहार फेज २ या ठिकाणी ही शाळा आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. दरम्यान या मुलीच्या पालकांनी आरोप केला आहे की तिला वेळेत CPR देण्यात आला नाही आणि प्रथमोपचारही करण्यात आले नाहीत.
नेमकं काय घडलं?
९ वर्षांची मुलगी वर्गात होती. ती उभी राहिली आणि अचानक खाली कोसळली. यानंतर तिच्या वर्गशिक्षिकेने तातडीने तिला रूग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. शाळा प्रशासनानेही ही माहिती दिली आहे की आम्ही तातडीने या मुलीला रूग्णालयात नेलं. पण तिचा मृत्यू कार्डिअॅक अरेस्टमुळे झाला आहे अशी माहिती डॉक्टरांनी दिली. मुलीची शुद्ध हरपली आहे असं आम्हाला सुरूवातीला वाटलं. ज्यानंतर आम्ही तिला तातडीने रूग्णालयात नेलं. पण तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं. इंडिया टुडेने हे वृत्त दिलं आहे.
दुसऱ्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काय?
या प्रकरणी दुसरं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं आहे. ज्यामध्ये ९ वर्षांची ही मुलगी पायऱ्या चढून तिच्या मित्र-मैत्रिणींसह येते. यानंतर वर्गात आल्यानंतर मुलं जागेवर बसत असतात. तेव्हा ही मुलगी उभी असते. ती वर्गात शिक्षिकेजवळ जात असते तेवढ्यात की कोसळते. ज्यानंतर मुलं आणि शिक्षिका तिच्या दिशेने धाव घेतात आणि तिला तातडीने रूग्णालयात नेतात. दरम्यान मुलीच्या पालकांनी प्रथमोपचार दिले गेले नाहीत आणि सीपीआर देण्यात आला नाही असा आऱोप केला आहे. मात्र शाळेने याबाबत स्पष्टीकरण दिलं आहे. या प्रकरणी पोलीस तपासही सुरू करण्यात आला आहे असंही सांगण्यात आलं आहे.
शाळेच्या मुख्याधापिका भावना मलिक काय म्हणाल्या?
शाळेच्या मुख्याधापिका भावना मलिक यांनी माध्यमांना सांगितलं की ९ वर्षांची मुलगी वर्गात कोसळली तेव्हा तिला तातडीने रूग्णालयात नेण्यात आलं. वर्गात शिक्षिका उपस्थित होत्या, त्यांनी या मुलीला उचललं आणि रूग्णालयात नेलं. पण तिला कार्डिअॅक अरेस्ट आल्याने तिचा मृत्यू झाला ही माहिती डॉक्टरांनी दिली. ही मुलगी खाली कोसळल्याने तिच्या हनुवटीतून रक्त येत होतं हे आम्ही पाहिलं त्यामुळे तातडीने तिला रूग्णालयात नेण्यात आलं. तरीही ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे आम्हालाही धक्का बसला आहे असं भावना मलिक यांनी स्पष्ट केलं.
