दिल्ली सामूहिक बलात्कार प्रकरण : “राहुल गांधी न्याय मिळेपर्यंत तुमच्यासोबत असेन”

दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेवरून विरोधक केंद्र सरकारवर टीका करू लागले आहे.

delhi rape, delhi rape news, delhi nangal rape, delhi 9 year old rape, delhi nine year old rape, Rahul gandhi
या घटनेनंतर दिल्लीतील महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला असून, दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेवरून विरोधक केंद्र सरकारवर टीका करू लागले आहे. (Photo: Twitter/@RahulGandhi)

महिला अत्याचाराच्या घटनेनं राजधानी पुन्हा एकदा हादरली. दिल्लीत एका ९ वर्षाच्या मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आली. या घटनेनंतर दिल्लीत संताप व्यक्त होत असून, सामूहिक बलात्कार आणि हत्येनंतर पीडितेवर आईवडिलांच्या संमतीशिवाय अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे राजकारण तापू लागलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज सकाळी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिल्लीतील छावणी परिसरात असलेल्या गावात जाऊन राहुल गांधी यांनी कुटुंबियांना मदतीची ग्वाही दिली.

दिल्लीतील छावणी परिसरातील नांगलगाव येथे मागास समाजातील एका नऊ वर्षीय मुलीची सामूहिक बलात्कार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर दिल्लीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, धक्कादायक बाब म्हणजे पीडितेच्या आईवडिलांची परवानगी न घेताच घाईघाईत अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पीडितेच्या कुटुंबियांनी हा आरोप केला असून, या प्रकरणाने उन्नावमधील घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत. तर दुसरीकडे या प्रकरणावरून राजकारण तापताना दिसत आहे.

दरम्यान, काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी बुधवारी सकाळी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिल्ली छावणी परिसरातील पीडितेच्या घरी जाऊन राहुल गांधी यांनी आईवडिलांसह कुटुंबियांची भेट घेतली. पीडितेच्या कुटुंबियांचं सांत्वन केल्यानंतर राहुल गांधींनी याबद्दल माहिती दिली. “मी पीडितेच्या कुटुंबियांशी बोललो, त्यांना न्याय हवाय. त्यांचं म्हणणं आहे की, त्यांच्यावर अन्याय केला जात आहे. त्यांची मदत करायला हवी. आम्ही मदत करू. मी त्यांना आश्वस्त केलं आहे की, न्याय मिळेपर्यंत राहुल गांधी तुमच्यासोबत असेन”, असं राहुल गांधी यांनी पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर सांगितलं.

राहुल गांधींच्या भेटीआधीच या मुद्द्यावरून राजकारण तापण्यास सुरूवात झाली आहे. या घटनेवरून विरोधकांकडून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केलं जात असून, तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओब्रायन यांनीही अमित शाह यांनी संसदेत येऊन निवेदन करण्याची मागणी केली आहे.

केजरीवालही घेणार पीडितेच्या कुटुंबियांची भेट

राहुल गांधींबरोबरच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट घेणार आहे. केजरीवाल आज (४ ऑगस्ट) पीडितेच्या कुटुंबियांना भेटणार आहे. या घटनेनंतर केजरीवाल यांनी ट्विटही केलं होतं. ज्यात ही घटना लज्जास्पद असल्याचं म्हटलं होतं. “दिल्लीत ९ वर्षाच्या चिमुकलीची अत्याचार करून हत्या केल्याची घटना लज्जास्पद आहे. दिल्लीतील कायदा व सुव्यवस्था सुधारण्याची गरज आहे. दोषींना लवकरात लवकर फाशी व्हायला हवी. पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेणार असून, न्यायासाठीच्या या लढाईत पीडितेच्या कुटुंबाला सर्वोतोपरी मदत करू”, केजरीवाल म्हणाले होते.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: 9 yr old raped in delhi forcibly cremated rahul gandhi meets the family of the minor girl bmh

ताज्या बातम्या