दिल्ली विमानतळावरून १२.९ किलो हेरॉईन जप्त करण्यात आले आहे. या हेरॉईनची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत तब्बल ९० कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातंय. सीमाशुल्क अधिकाऱ्यांनी दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर कारवाई करत युगांडाच्या दोन महिलांकडून हेरॉईन जप्त केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. या दोघीही १२ आणि १३ नोव्हेंबर २०२१ च्या मध्यरात्री नैरोबी (केनिया) येथून अबू धाबी मार्गे भारतात आल्या होत्या.

“युगांडाच्या दोन महिला प्रवाशांकडून आणि त्यांच्या तीन सुटकेसमधून एकूण जवळपास १३ किलो क्रिस्टलीय हेरॉईन जप्त करण्यात आले. दिल्ली विमानतळावर तैनात असलेल्या भारतीय सीमाशुल्काच्या श्वान पथकाने प्रवाशांच्या सामानाची तपासणी करताना शोध घेत या सामानात काही अंमली पदार्थ असल्याचे सूचित केले,” असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अधिकाऱ्यांनी कसून शोध आणि चौकशी केल्यानंतर, महिला प्रवाशांनी हेरॉईन त्यांच्या चेक बॅगेजमध्ये हेरॉईन आणल्याचे कबूल केले आणि सूटकेसच्या दोन्ही बाजूंच्या फायबर-प्लास्टिक बेसच्या बनावट थराच्या खाली खास बनवलेल्या जागेत हेरॉईन लपवून ठेवले होते. जप्त केलेले हेरॉईन प्लास्टिक आणि कागदी पिशव्यांमध्ये व्हॅक्यूम पॅक केलेले होते आणि त्यात क्रिस्टलाइन ऑफ-व्हाइट पावडर हेरॉईन होते. यासंदर्भात इंडिया टूडेने वृत्त दिलंय.

दिल्ली विमानतळावर अटकेपूर्वी दोन्ही महिला युगांडा आणि केनियामधील विमानतळांवरून सुरक्षितपणे निसटल्य होत्या. चौकशीदरम्यान, एका महिलेने सांगितले की तिची एका केनियन नागरिकाशी ओळख झाली होती, ज्याने तिला दिल्लीत या वस्तू पुरवण्याच्या बदल्यात पैसे देण्याचे वचन दिले होते. त्यानंतर या महिलेने कंपाला ते नैरोबी असा रस्त्याने प्रवास केला. तिथे त्या माणसाने दिल्लीत हरॉईनची डिलिव्हरी करण्यासाठी बॅग, तसेच तिकीट आणि वैद्यकीय पर्यटक म्हणून दाखवण्यासाठी काही कागदपत्रे दिली. तर दुसऱ्या महिलेने तिला बहिणीनेच पाठवले असल्याचं सांगितलं.