Retired Air Force doctor falls victim to a 2.5 crore scam: देशात आणि राज्यात डिजिटल अरेस्ट या सायबर फसवणुकीची प्रकरणे वाढत असून दिवसेंदिवस या प्रकाराला अनेक लोक बळी पडत आहेत. आजच महाराष्ट्राच्या विधानसभेत याची चर्चा झाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, डिजिटल अरेस्ट असा कोणताही प्रकार कायद्यात नाही. त्यामुळे अशी बतावणी करणारा फोन आल्यास तात्काळ सायबर हेल्पलाईनशी संपर्क साधावा. केंद्र सरकार आणि बँकांकडूनही वारंवार अशाप्रकारच्या सूचना देऊन सावध केले जाते. मात्र तरीही बळींची संख्या कमी होताना दिसत नाही. नुकतेच हवाई दलाच्या ९० वर्षीय माजी डॉक्टरची अडीच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

मध्य प्रदेशच्या ग्वाल्हेर येथे राहणाऱ्या ९० वर्षीय डॉक्टरांना तब्बल २५ दिवस डिजिटल अरेस्टमध्ये ठेवले गेले होते. फसवणूक झाल्यानंतर त्यांनी याबद्दलची तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, २५ जानेवारी रोजी त्यांना तपास यंत्रणेमधून बोलत असल्याचा एक फोन आला होता. डॉक्टरांचे कागदपत्रे अवैध कामासाठी वापरली गेल्याचे सांगून त्यांच्या विरोधात अटकेची कारवाई होऊ शकते, अशी भीती वृद्ध डॉक्टरांना दाखवली गेली.

ऑनलाइन सर्व्हेलन्सची बतावणी करत सायबर चोरट्यांनी वृद्ध डॉक्टरांना सतत व्हिडीओ कॉलसमोर बसण्यास भाग पाडले. तसेच ही कायदेशीर कारवाई आहे, असा आभासही चोरट्यांनी निर्माण केला. तसेच हे प्रकरण गोपनीय असल्यामुळे याची माहिती कुटुंबियांना किंवा इतरांना देण्यास मनाई करण्यात आली. अन्यथा याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी त्यांना दिली गेली.

सायबर चोरट्यांनी वृद्ध डॉक्टर यांचे वय आणि त्यांच्या एकाकीपणाचा फायदा घेत त्यांच्यावर मानसिक दबाव टाकला. तसेच हळूहळू त्यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यामधील पैसे इतर खात्यात वळते करण्यास भाग पाडले. जवळजवळ २५ दिवसांच्या कालावधीत चोरट्यांनी तब्बल २.५ कोटी रुपये हस्तांतरीत करून घेतले.

दरम्यान बँक अधिकाऱ्यांना मोठ्या रकमेचा व्यवहार झाल्याचे लक्षात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. बँक अधिकाऱ्यांनी पीडित वृद्धाला एवढी मोठी रक्कम वळती करण्याचे कारण विचारल्यानंतर पीडित वृद्धाने सर्व हकीकत सांगितली. यानंतर त्यांना त्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठून याबद्दलची तक्रार दाखल केली.