94 year old woman leaves US citizenship for India News: “माझी शेवटची इच्छा एवढीच आहे की, मी भारतीय नागरिक म्हणून मरावं आणि माझ्याच जन्मभूमीत माझ्यावर अंत्यसंस्कार व्हावेत…” वयाच्या ९४ व्या वर्षी एका वृद्ध माऊलीने व्यक्त केलेली ही भावना सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आंध्र प्रदेशातील ९४ वर्षांच्या कोंड्रागुंटा महालक्ष्मीम्मा यांनी अमेरिकेचे (US) नागरिकत्व सोडून पुन्हा भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठीची मागणी सरकारकडे केली आहे. तब्बल १८ वर्षे अमेरिकेत वास्तव केल्यानंतर आयुष्याच्या उत्तरार्धात त्यांना आपल्या मातृभूमीची ओढ स्वस्थ बसू देईना.
‘कलेक्टर साहेब, मला भारतातच मरायचंय…’
बुधवारी महालक्ष्मीम्मा या आपल्या मुलासोबत आंध्र प्रदेशातील बापटला जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जे. व्यंकट मुरली यांच्या कार्यालयात पोहोचल्या. वयाच्या ९५ कडे झुकलेल्या महालक्ष्मीम्मा यांनी जेव्हा जिल्हाधिकाऱ्यांकडे आपली व्यथा मांडली, तेव्हा तेथील अधिकारीही भावूक झाले.
“कलेक्टर गारू, माझे वय आता ९५ च्या जवळ आले आहे. माझी फक्त एकच शेवटची इच्छा आहे की मी माझे उर्वरित दिवस माझ्या मातृभूमीत घालवावे आणि एक भारतीय नागरिक म्हणून अंतिम श्वास घ्यावा. मी अमेरिकेचे नागरिकत्व आधीच सोडले आहे. कृपया मला लवकरात लवकर भारतीय नागरिकत्व मिळवून देण्यासाठी मदत करा,” अशी भावनिक साद महालक्ष्मीम्मा यांनी घातली.
…आणि त्यांनी अमेरिकेच्या ‘ग्रीन कार्ड’चा मोह सोडला
महालक्ष्मीम्मा यांनी अधिकाऱ्यांना त्यांच्या प्रवासाविषयी सविस्तर माहिती दिली. पती नागाभूषणम यांच्या निधनानंतर, त्या अमेरिकेतील व्हर्जिनिया येथील पीटर्सबर्ग येथे गेल्या होत्या. त्यांचा मुलगा बुच्चय्या चौधरी हे तिथे कर्करोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत होते. मुलासोबत राहताना जुलै २००० मध्ये महालक्ष्मीम्मा यांनी अमेरिकेचे नागरिकत्व स्वीकारले आणि पुढील १८ वर्षे त्या तिथेच राहिल्या.
मात्र, २०१८ मध्ये त्यांचे डॉक्टर सुपुत्र मंगलागिरी येथील एनआरआय (NRI) रुग्णालयात रुजू झाले आणि हे कुटुंब पुन्हा आपल्या मूळ गावी परतले. भारतात परतल्यानंतर महालक्ष्मीम्मा यांना आपल्या मातीची तीव्र ओढ लागली आणि त्यांनी अमेरिकेचे नागरिकत्व सोडण्याचा मोठा निर्णय घेतला.
केंद्र सरकार घेणार अंतिम निर्णय
महालक्ष्मीम्मा यांनी भारतीय नागरिकत्वासाठी सरकारच्या ऑनलाइन पोर्टलवर आधीच अर्ज केला आहे. तसेच, आपण भारताच्या संविधानाचा पूर्ण आदर करू आणि देशातील सर्व नियमांचे पालन करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली आहे.
या संपूर्ण प्रकरणावर बापटलाचे जिल्हाधिकारी जे. व्यंकट मुरली यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. “या अर्जावर नियमांनुसार योग्य ती कायदेशीर प्रक्रिया तातडीने सुरू केली जाईल. स्थानिक पातळीवरील चौकशी पूर्ण झाल्यानंतर याचा अहवाल राज्य सरकारकडे पाठवला जाईल. त्यानंतर राज्य सरकार अंतिम मंजुरीसाठी हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवेल,” असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
पैसा, प्रतिष्ठा आणि अमेरिकेचे नागरिकत्व या सगळ्यापेक्षा आपल्या मातृभूमीची माती आणि संस्कृती किती श्रेष्ठ आहे, याचेच आदर्श उदाहरण महालक्ष्मीम्मा यांनी जगासमोर ठेवले आहे.
