Couple Marry After 70-Year Live-In Relationship watch Video : राजस्थानमधील एका जोडप्याने तब्बल ७० वर्षे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर लग्न केले आहे. या जोडप्याला सोशल मीडियावर प्रंचड लोकप्रियता मिळताना पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या डुंगरपूर जिल्ह्यातील गालंदर या एका आदिवासी गावातील राम भाई खरारी (९५) आणि जीवाली देवी (९०) असे या लग्नगाठ बांधलेल्या दोघांची नावे आहेत. विशेष म्हणजे या दोघांनी लग्न केले नसले तरी त्यांना आठ मुले आणि अनेक नातवंडे आहेत. मात्र सात दशके एकत्र राहिल्यानंतर या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि विशेष म्हणजे या निर्णयाला त्यांच्या मुलांनी देखील पूर्ण पाठिंबा दर्शवला.

त्यांनी लग्न करण्याची इच्छा दाखवली आणि संपूर्ण कुटुंबाने निर्णय घेतला की आपण हे करूयात. गावातील मोठ्या लोकांचा देखील सल्ला घेण्यात आला आणि १ जून रोजी हळदीचा कार्यक्रम पार पडला. संपूर्ण गावाच्या उपस्थितीत लग्नसोहळा ४ जून रोजी संपन्न झाला, असे या जोडप्याचा मुलागा कांती लाल खरारी यांनी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितले. “ते आनंदी आहेत आणि आम्ही देखील आनंदी आहोत,” असेही खरारी यांनी पुढे बोलताना सांगितले.

लग्नाच्या आधी काढल्या जाणारी मिरवणूक ज्याला बांदोली देखील म्हणतात यामध्ये डीजे संगीत लावण्यात आले होते, ज्याच्या तालावर गावकऱ्यांना डान्स केला, या मिरवणुकीत या जोडप्याची मुले देखील सहभागी झाली होती. सर्वांच्या उपस्थितीत जोडप्याने सात फेरे घेतले आणि सर्व गावकऱ्यांना जेवण देण्यात आले.

राजस्थानमधील आदिवासी परंपरा

हे जोडपे राजस्थानमधील आदिवासी भागाचे वैशिष्ट्य असलेल्या नाता परंपरेनुसार एकत्र राहत होते. या प्रथेनुसार, कोणताही आदिवासी पुरुष किंवा महिला लग्न न करता त्यांच्या आवडीच्या दुसऱ्या व्यक्तीबरोबर राहू शकतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच अशा नात्यातून जन्माला येणाऱ्या मुलांना पुरूषाच्या सर्व प्रकारच्या मालमत्तेवर अधिकार असतो. मात्र विवाहित नसल्यामुळे काही निर्बंध पाहायला मिळतात. हे निर्बंध विशेषतः सामाजिक कार्यक्रमांमध्ये असतात. जसे की महिलांना त्यांच्या मुलांच्या लग्न समारंभात, हळदी कार्यक्रमात, नवऱ्यामुलाचे स्वागत करताना त्यामध्ये सहभागी होण्याची परवानगी नसते.