एका ३९ वर्षीय घरकाम करणाऱ्या आदिवासी महिलेला घरमालकांनी त्यांच्याच घरात तब्बल दोन वर्ष कोंडून ठेवले. ही घटना गुरुग्रामच्या सेक्टर ९१मधून समोर आली आहे. ही महिला मूळची पश्चिम बंगाल येथील बीरभूमची असून तिला वेठबिगार म्हणून गुरुग्राम येथे आणण्यात आले होते. तिला दिवसाचे सोळा तास काम करण्यास भाग पाडले जायचे. घरातील स्मार्ट लॉकिंग सिस्टीममुळे तिला घराबाहेर येता आले नाही असे पोलिसांनी सांगितले. पीडितेची सुटका होताच तिची बहीण तात्काळ गुरुग्राम येथे तिच्या मदतीसाठी दाखल झाली. एका टेक्निशियनच्या मदतीमुळे तिची या जाचातून सुटका झाली असे तिच्या बहिणीने सांगितले. पीडितेच्या बहिणीने सर्वप्रथम बीरभूम येथील अधिकाऱ्यांकडे धाव घेतली. तिच्या बहिणीने सांगितले की, तिला अगदी छोट्या छोट्या कारणांवरून मारहाण करण्यात येत होती. तिने घरी जाण्याची विनंती केली तरी तिला जबर मारहाण केली जात असे. तिच्या घरमालकांनी तिला कोंडले आणि ते घर बंद करून बाहेर निघून गेले.
टेक्निशियनच्या मदतीमुळे सुटका
काही दिवसांपूर्वी सर्व्हिसिंग करण्यासाठी एक टेक्निशियन जेव्हा त्यांच्या घरी पोहोचला, तेव्हा पीडितेने घरी संपर्क साधण्यासाठी त्याच्याकडे विनंती केली, असे पोलिसांनी सांगितले. तिने टेक्निशियनकडून मोबाईल घेऊन त्यावरून घरी फोन केला आणि तिची हकीकत नातेवाईकांना सांगितली आणि तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्यास सांगितले. ४ जूनला पश्चिम बंगालमधील पोलिस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार नोंदविण्यात आली. वेठबिगार पध्दती (उच्चाटन) अधिनियम, १९७६ आणि भारतीय न्याय संहितेच्या कलम १२७(४) अंतर्गत शोषण आणि वेठबिगारीसंदर्भात गुन्हा नोंदविण्यात आला.
आधी दिल्ली, नंतर गुरुग्राम…
पश्चिम बंगाल पोलीस, गुरुग्राम पोलीस, जिल्हा प्रशासन गुरुग्राम आणि काही सामाजिक संस्थांच्या एकत्रित प्रयत्नांमुळे अखेरीस तिची सुटका करण्यात यश आले. अधिकाऱ्यांनी तिच्या सुटकेनंतर असेही सांगितले की तिचा प्रचंड शारिरीक तसाच मानसिक छळ करण्यात आला. तिला इतकी मारहाण करण्यात आली की तिला तिचा उजवा हात उचलता येत नव्हता. तसेच, उजव्या कानाने ऐकूदेखील येत नव्हते. पुढे त्यांनी असे नमूद केले की ज्या दिवशी तिची सुटका करण्यात आली, त्या दिवशी सकाळी तिच्या डोक्यावर तसेच तिच्या थोबाडीत इतक्या वेळा मारण्यात आले की त्यामुळे तिचा जीवदेखील जाऊ शकला असता. या महिलेला सर्वप्रथम दिल्ली येथे घरकामासाठी आणण्यात आले. पुढे तिची रवानगी गुरुग्रामला करण्यात आली. या कामासाठी तिला आगाऊ ४० हजार रुपये त्या कुटुंबाकडून देण्यात आले होते. तिला इथे कोणत्या परिस्थितीत आणण्यात आले त्याची अजून चौकशी सुरू आहे.
सेक्टर ९३चे सहाय्यक उप-निरीक्षक राजेश खोवाल यांनी इंडियन एक्सप्रेसला सांगितले, की पीडितेला जेव्हा सोडवण्यात आले तेव्हा त्या कुटुंबातील कोणीही घरी उपस्थित नव्हते. आणखी एका अधिकाऱ्याने असे सांगितले की सध्या प्राथमिक पातळीवर तपास सुरू असून पुढील सर्व तपास हा पश्चिम बंगाल पोलीस करणार आहे. पुढे ते असंही म्हणाले, आम्ही आरोपीच्या कुटुंबियांनी तपासात मदत करावी अशी नोटीसदेखील त्यांच्या घराबाहेर लावली असून त्याची एक प्रत तेथील सुरक्षारक्षकालादेखील दिलेली आहे. प्रथमदर्शनी तपासातून असे लक्षात येते की, या कुटुंबियांनी पीडितेचा प्रचंड शारिरीक, तसेच मानसिक छळ केला. या सर्वाचा तिच्या मनावर गंभीर परिणाम झाला आहे.
