बेदरकारपणे गाडी चालवून एका महिला फॅशन डिझायनरने बेघर महिलेला चिरडले. दिल्लीतील कनॉट प्लेस या ठिकाणी ही धक्कादायक घटना घडली. श्रेया अग्रवाल असे या तरूणीचे नाव असून ती मूळची उत्तर प्रदेशातील आहे. मुंबईत ती फॅशन डिझायनिंगचा कोर्स करते आहे अशीही माहिती मिळते आहे.

रविवारी रात्री श्रेया तिच्या एसयूव्ही कारने दिल्लीतल्या मित्रांना भेटायला गेली होती. तिच्यासोबत तेव्हा ड्रायव्हर होता. मात्र कनॉट प्लेस भागात आल्यावर तिने गाडी स्वतः चालवण्यास सुरूवात केली. त्याचवेळी भरधाव वेगात गाडी चालवत तिने बेघर महिलेला उडवले. हा अपघात इतका भीषण होता की ती महिला या कारसोबत ३०० मीटरपर्यंत फरफटत गेली. रस्त्यावरचे लोक आरडा ओरड करत होते. मात्र श्रेया थांबली नाही. तिने आपली एसयुव्ही सुसाट पळवत होती.

एसयुव्ही चालवताना तिला भान राहिले नाही त्यामुळे ती वन-वे मध्ये शिरली. तिच्या कारच्या मागे लोकही महिलेला वाचवण्यासाठी मागे धावत होते. विरूद्ध दिशेने येणारी काळ्या रंगाची एसयुव्ही पाहून तिथल्या पोलिसांना संशय आला. तसेच या कारच्या टायरमध्ये अडकलेली महिलाही पोलिसांना दिसली. ज्यानंतर त्यांनी मार्गात बॅरिकेट्स टाकले. पोलिसांच्या या कृतीमुळे श्रेयाला कार थांबवावीच लागली. ३०० मीटर फरफटत गेलेल्या महिलेला पोलिसांनी बाहेर काढले. ती गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे तिला तातडीने रूग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. या घटनेनंतर चिडलेल्या जमावाने श्रेया विरोधात कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू आहे. हिंदुस्थान टाइम्सने या संदर्भातले वृत्त दिले आहे.