पीटीआय, नवी दिल्ली
लष्कराने ‘अग्नीवीर’ भरती प्रक्रियेत बदल जाहीर केले आहेत. त्याअंतर्गत भरतीस इच्छुक उमेदवारांना आता प्रथम ‘ऑनलाइन’ सामायिक प्रवेश परीक्षा (सीईई) द्यावी लागेल. यानंतर उमेदवारांना शारीरिक तंदुरुस्ती चाचणी आणि वैद्यकीय तपासणीस सामोरे जावे लागेल. भरती प्रक्रियेतील या बदलासंदर्भात फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत अधिसूचना प्रसृत होण्याची अपेक्षा असल्याचे सूत्रांनी शनिवारी सांगितले.
आधीच्या अग्निवीर भरती प्रक्रियेत उमेदवारांना प्रथम शारीरिक तंदुरुस्ती चाचणी, त्यानंतर वैद्यकीय तपासणी आणि नंतर अंतिम टप्प्यावर प्रवेश परीक्षा द्यावी लागत असे. मात्र, आता ‘ऑनलाइन’ प्रवेश परीक्षा हा पहिला टप्पा असेल. भरतीसाठी पहिली ‘ऑनलाइन’ परीक्षा एप्रिलमध्ये देशभरात सुमारे २०० ठिकाणी होण्याची शक्यता आहे. त्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. या बदलामुळे भरती मेळाव्यादरम्यान होणारी गर्दी कमी होईल. त्यामुळे भरती प्रक्रियेचे आयोजन-व्यवस्थापन करणे सोपे होईल, असे मानले जाते.
२०२३-२४ च्या भरतीपासून या योजनेंतर्गत इच्छुक असलेल्या सुमारे ४० हजार उमेदवारांना नवीन प्रक्रिया लागू होईल. या प्रक्रियेतील बदलाबाबत लष्कराकडून विविध वृत्तपत्रांमध्ये जाहिराती देण्यात आल्या आहेत. बदललेल्या पद्धतीनुसार आकलनसंबंधित पैलूंवर अधिक लक्ष केंद्रित केले जाईल. तसेच ती अधिक देशव्यापी होईल. यामुळे चाचणी प्रक्रिया आणि त्यासाठी लागणाऱ्या यंत्रणेच्या दळणवळणाच्या सुलभतेसाठी याची मदत होईल.