दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांची भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) भ्रष्टाचारविरोधी आणि सुरक्षा समितीच्या मुख्य सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आल्याने पुन्हा एकदा संघटनेतील अंतर्गत हितसंबंधाच्या मुद्दयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दिल्लीतील कंपनी नोंदणी कार्यालयाच्या माहितीनूसार, नीरज कुमार यांची मुलगी अंकिता हिच्या नावे असलेल्या तीन कंपन्यांना आयपीएल समितीवरील पदाधिकाऱ्यांच्या नातेवाईकांकडून मदत केली जात असल्याचे उघड झाले आहे. व्यवसायाने पटकथा लेखक असणारी अंकिता ही २०१३ सालापर्यंत E-२४ आणि अन्य दोन कंपन्यांच्या संचालकपदी होती. यापैकी स्कायलाईन रेडिओ नेटवर्क लिमिटेड आणि न्यूज २४ ब्रॉडकास्ट इंडिया लिमिटेड कंपन्यांना आयपीएलच्या गव्हर्निंग कमिटीचे अध्यक्ष राजीव शुक्ला यांची पत्नी अनुराधा प्रसाद यांच्याकडून मदत केली जात होती. याप्रकाराबद्दल शुक्ला आणि त्यांच्या पत्नीला विचारण्यात आले असता त्यांनी अंकिता हिने या सर्व कंपन्यांच्या संचालकपदावरून राजीनामा दिल्याचे सांगितले. तर नीरज कुमार यांनी माझ्या मुलीचे नाव याप्रकरणात जाणुनबुजून गोवण्यात येत असल्याचा आरोप करत, आपण याप्रकरणी दाद मागणार असल्याचे सांगितले. २०१३ साली घडलेल्या आयपीएल स्पॉट फिक्सिंग प्रकरणाच्यावेळी नीरज कुमार दिल्लीच्या पोलीस आयुक्तपदी होते.