पीटीआय, चेन्नई : भारतातील ‘हरित क्रांतीचे जनक’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ कृषीशास्त्रज्ञ डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्या पार्थिवावर शनिवारी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. येथील बेसंतनगर विद्युतदाहिनी स्मशानभूमीत त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे कुटुंबीय यावेळी उपस्थित होते.
तमिळनाडू पोलिसांच्या पथकाने त्यांना बंदुकीची सलामी दिली. तसेच बिगुलावर शोधधुन वाजवण्यात आली. स्वामिनाथन यांचे गुरुवारी येथे निधन झाले. ते ९८ वर्षांचे होते. यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी चेन्नई येथील एम. एस. स्वामिनाथन रिसर्च फाउंडेशन (एमएसएसआरएफ) या संस्थेच्या आवारात ठेवण्यात आले होते. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी सर्व स्तरांतील नागरिकांनी, विशेषत: शेतकऱ्यांनी गर्दी केली. स्वामिनाथन यांच्या पश्चात तीन मुली आहेत. त्यांची कन्या डॉ. सौम्या स्वामिनाथन यांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिले आहे.