वृत्तसंस्था, गाझा, जेरुसलेम
इस्रायल आणि हमासदरम्यान युद्धादरम्यान चार दिवसांचा विराम शुक्रवापर्यंत लांबवणीवर पडला आहे. यासंबंधीचा निर्णय बुधवारी जाहीर करण्यात आल्यानंतरही गाझा पट्टीतील धुमश्चक्री थांबलेली नाही. आधी जाहीर करण्यात आलेल्या निर्णयानुसार, गुरुवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी विराम लागू होणार होता.दुसरीकडे, ओलिसांच्या सुटकेसाठी वाटाघाटी अजूनही सुरू आहेत आणि त्यामध्ये प्रगती होत आहे, अशी माहिती इस्रायलच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी दिली. दोन्ही पक्षांदरम्यान झालेल्या समझोत्यानुसारच ओलिसांच्या सुटकेला सुरुवात होईल, शुक्रवारपूर्वी या सुटका होणार नाहीत असे त्यांनी जाहीर केले. करारानुसार हमास २४० पैकी ५० ओलिसांची सुटका करणार आहे, तर इस्रायल १५० पॅलेस्टिनी कैद्यांना सोडणार आहे. समझोता संपुष्टात आल्यावर युद्ध पुन्हा सुरू होईल, असे दोघांनीही जाहीर केले आहे.
इस्रायली सैन्याने गुरुवारीही उत्तर गाझामध्ये हवाई हल्ले सुरू ठेवले. त्यामुळे तिथे मोठय़ा प्रमाणात धुराचे लोट दिसत होते. त्याच्या जोडीला स्फोटांचे आवाज आणि तोफांचे आवाजही ऐकायला येत होते. दक्षिण गाझामधील लाखो लोकांनी आश्रय घेतलेल्या रफा येथे सामान्य पॅलेस्टिनी त्यांच्या उद्ध्वस्त झालेल्या इमारतींच्या ढिगाऱ्यांमध्ये आपापल्या सामानाचा शोध घेताना दिसत होते. इस्रायली सैन्याने बुधवारी गाझा पट्टीवर ३०० हवाई हल्ले केल्याची माहिती दिली.दरम्यान, अमेरिकेतील २०पेक्षा जास्त काँग्रेस सदस्यांनी विरामाची मुदत वाढवण्याची मागणी केली आहे. अध्यक्ष जो बायडेन यांना पत्र लिहून त्यांनी ही मागणी केली.
हेही वाचा >>>“तुम्ही आमच्या चार नेत्यांना अटक केली, तर आम्ही…”, ममता बॅनर्जींचा भाजपाला थेट इशारा
युद्धामध्ये सामान्यांची मोठी जीवितहानी
हमासने ७ ऑक्टोबरला केलेल्या हल्ल्यामध्ये इस्रायलमधील १,२०० जणांचा मृत्यू झाला आणि त्यांनी २४० जणांना ओलीस धरले. तर गाझामधील आरोग्य अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार १४ हजारांपेक्षा जास्त पॅलेस्टिनींचा इस्रायलच्या हल्ल्यांमध्ये मृत्यू झाला आहे.
गाझा पट्टी मुलांसाठी सर्वात धोकादायक
युनिसेफने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार इस्रायलने ८ ऑक्टोबरपासून गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये, म्हणजेच गेल्या ४६ दिवसांमध्ये ५,३०० पेक्षा जास्त पॅलेस्टिनी मुलांचा मृत्यू झाला. गाझा पट्टी हा लहान मुलांसाठी सर्वात धोकादायक प्रदेश असल्याचे युनिसेफने जाहीर केले आहे.
