नवीन तंत्रज्ञांच्या पिढीची कल्पकता चांगली आहे, असे म्हणायला हरकत नाही. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणाऱ्या तरुणांच्या एका गटाने जे लोक परिसर स्वच्छ ठेवतील, तेथे वाय-फाय ट्रॅश बिन सेवा सुरू करण्याचा प्रयोग केला आहे. थोडक्यात जे लोक स्वच्छता पाळतील, त्यांना वाय-फाय सेवा ते उपलब्ध करून देऊ शकतात.
या योजनेतील एक प्रमुख असलेल्या प्रतीक अगरवाल यांनी सांगितले, की जर तुम्ही कचरा रस्त्यावर न टाकता तो कचरा पेटीत टाकला, तर एक विशिष्टसांकेतांक प्रसारित होऊन तुम्हाला वाय-फाय सेवा मिळते. कॉमर्सच्या दोन पदवीधरांनी ही सेवा प्रायोगिक पातळीवर यशस्वी केली आहे. मुंबईचे प्रतीक आगरवाल व त्यांचे सहकारी राज देसाई (प्रोग्रॅमर-आज्ञावलीकार) यांनी डेन्मार्क, फिनलंड, सिंगापूर व अनेक देशांत प्रवास केला त्यांना असे लक्षात आले, की स्वच्छता राखण्यासाठी लोकांचा दृष्टिकोन बदलला पाहिजे. त्यामुळे त्यांनी फिनलंड, डेन्मार्क , सिंगापूर या देशांची मदत घेतली व त्यांच्यासारखीच व्यवस्था उभारण्याचे ठरवले आहे, असे प्रतीक यांचे मत आहे. एनएच ७ विकएंडर संगीत महोत्सवासाठी गेले असताना त्या मोठय़ा भागात मोठय़ा प्रमाणावर पेयांच्या बाटल्या व कचरा पडला होता, त्यावरून त्यांना ही कल्पना सुचली. त्या वेळी आम्हाला मित्रांना शोधायला सहा तास लागले व फोन कॉलच्या माध्यमातून पोहोचू शकलो नाही, त्यामुळे आम्ही वाय फाय सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. वाय-फाय सेवेमुळे मित्र एकमेकांशी जोडले जातात हा अभिनव प्रकल्प आहे. स्वनिधीतून हा प्रयोग एमटीएसच्या मदतीने करण्यात आला. बंगळुरू, कोलकाता व दिल्ली येथील साप्ताहिक संगीत महोत्सवात तो यशस्वी झाला पण अजून सुरू केलेला नाही. स्वच्छतेच्या बदल्यात वाय-फाय अशी ही संकल्पना आहे. गेल व इतर कंपन्यांकडून या प्रकल्पासाठी मागण्या आल्या आहेत. लोकांचे वर्तन सुधारण्यासाठी ही संकल्पना मांडली आहे, असे देसाई सांगतात. इंटरनेट ही काळाची गरज आहे व ती वाय-फायच्या माध्यमातून उपलब्ध करता येते. लोकांचे वर्तन सुधारण्यासाठी काही ठिकाणी तरी वाय-फाय बिन्स उभारण्याचा त्यांचा विचार आहे. एरिकसन व सीएनएन-आयबीएन यांनी वेगळी संकल्पना म्हणून नेटवर्कड इंडिया कार्यक्रमात त्यावर कार्यक्रमही सादर केला आहे.

वाय-फाय ट्रॅश बिन
* रुंदी- दीड फूट
* उंची- ४ फूट
* संबंधित भाग- अ‍ॅक्रिलिक शीट वाय-फाय रूटर  अ‍ॅल्युमिनियम दांडय़ा प्रदीप्त दिवा एलइडी दिवा आयआर संवेदक