“…बाबा तो माझी हत्या करेल”, मुलीची भीती ठरली खरी, आरोपीने चहाच्या मळ्यात पुरला मृतदेह

केरळमध्ये बारावीत शिकणाऱ्या मुलीचं अपहरण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे

प्रतिनिधिक छायाचित्र

केरळमध्ये बारावीत शिकणाऱ्या मुलीचं अपहरण करुन हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी संध्याकाळी मुलगी बेपत्ता झाली होती. वडील शाळेतून आणण्यासाठी गेले असता मुलगी बेपत्ता झाली असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. काही तासांना पोलिसांनी फोन करुन तामिळनाडू येथे मुलीचा मृतदेह सापडला असल्याचं त्यांना कळवलं. कुटुंबाला ज्या गोष्टीची भीती होती तिच गोष्ट झाली होती. २६ वर्षीय सफर या तरुणाने अपहरण करुन तिची हत्या केली होती. सफर याने अनेकदा मुलीला त्रास दिला होता. तो नेहमी मुलीवर नजर ठेवून असायचा. छेड काढणे, धमकावणे, फोटोंशी छेडछाड करणे असे अनेक प्रकार त्याने केले होते.

मुलीचे वडील जेव्हा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करत होते तेव्हा सफर मुलीला गाडीतून कोचीबाहेर घेऊन चालला होता. काम करत असलेल्या कार सर्व्हिस सेंटरमधून त्याने ही गाडी चोरली होती.

तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपास सुरु केला. यादरम्यान पोलिसांनी गाडी नेहमी कुठे पोहोचली आहे याची माहिती घेतली. काही तासांत पोलिसांनी कारचा शोध घेतला. पण गाडी सापडली तेव्हा त्यामध्ये फक्त सफर होता. पोलिसांनी चौकशी केली असता आपण मुलीची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. हत्या करुन मृतदेह चहाच्या मळ्यात पुरला असल्याचं यावेळी त्याने पोलिसांना सांगितलं.

पोलिसांनी घटनास्थळी जाऊन मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. मुलीच्या अंगावर त्यावेळी शाळेचाच गणवेश होता. मुलीच्या वडिलांनी दिलेल्या माहितीनुसार, सफर अनेकदा आपल्या मुलीला धमकावत असे. यामुळेच आपण तिला शाळेत जाताना आणि येताना सोबत देत असे. “त्याने माझ्याकडे मुलीसोबत लग्न करण्याची मागणी केली होती. पण आम्ही नकार दिला. मुलीने मला हा व्यक्ती त्रास देत असून धमकावत असल्याचं सांगितलं होतं. त्याने फोटोंसोबत छेडछाड केल्याने ती खूप नाराज होती. तो आपली हत्या करेल याची तिला भीती होती. त्याच्यामुळे मी तिला नेहमी शाळेत सोडण्यासाठी आणि आणण्यासाठी जात असे. मी मंगळवारी तिला शाळेत सोडलं. पण आणण्यासाठी गेलो तेव्हा ती बेपत्ता असल्याचं लक्षात आलं,” असं मुलीच्या वडिलांनी सांगितलं आहे.

आरोपी सफर याने मात्र पोलिसांकडे आपल्यात प्रेमसंबंध होते आणि ती परदेशात शिक्षणासाठी जाणार होती म्हणूनच हत्या केल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरु आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: A girl abduct and murdered in kerala sgy

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या