बिहारमधील सीतामढी येथे एक अत्यंत धक्कादायक प्रकार घडला आहे. सीतामढी येथील एका खासगी नर्सिंग होममध्ये अज्ञात लोकांनी केलेल्या गोळीबारात एका नर्सची हत्या झाली आहे. मंगळवारी (२४ ऑगस्ट) रात्री घडलेल्या या प्रकारात एका नर्सचा मृत्यू झाला असून एक डॉक्टर गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळते. डॉ शिवशंकर महतो, त्यांची पत्नी, दोन कर्मचारी आणि नर्स रोजापट्टी येथील नर्सिंग होममध्ये पोहोचल्यानंतर ही घटना मंगळवारी रात्री घडली. एएनआय या वृत्तसंस्थेने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

डॉ शिवशंकर महतो यांच्यासह हे इतर जण कारमधून खाली उतरताच चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली. या घटनेत डॉ. महतो यांना तीन गोळ्या तर नर्स बबली पांडे यांना पाच गोळ्या लागल्या. दुर्दैवाने बबली पांडे यांचा जागीच मृत्यू झाला. डॉ. महतो यांच्यावर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

डॉक्टरांच्या भाच्याची चौकशी सुरु

जखमी डॉक्टरांवर उपचार करणारे डॉ. प्रवीण कुमार म्हणाले कि, “डॉ महतो यांच्या छातीत, हातात आणि पायात तीन गोळ्या लागल्या आहेत. ऑपरेशन झालंआहे.” तर डॉ महतो म्हणाले कि, “आमच्यात हा पूर्वीपासूनचा वाद सुरू होता. काल आम्ही क्लिनिकमध्ये पोहोचलो तेव्हा काही अज्ञातांनी अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली.” दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सीतामढी पोलीस हे सध्या डॉक्टरांच्या भाच्याची चौकशी करत आहेत.

प्रकरण जमिनीच्या वादाशी संबंधित?

सीतामढी येथील हे प्रकरण जमिनीच्या वादाशी संबंधित असण्याची शक्यता आहे. डॉ. महतो हे त्यांच्या पत्नी डॉ. शबनम यांच्यासोबत नर्सिंग होम चालवतात. सीतामढीचे पोलीस अधीक्षक हरकिशोर राय याविषयी म्हणाले कि, “आम्ही एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. डॉ. महतोच्या दोन लग्नांबाबत कौटुंबिक वाद आहेत. या सर्व मुद्द्यांची दखल घेऊन आम्ही तपास सुरू केला आहे.”