एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नेमण्यात आलेले गजेंद्र चौहान यांची नियुक्ती केवळ एका परिच्छेदाच्या कारकीर्द माहितीवर (करिक्युला व्हिस्टा-सीव्ही) आधारे करण्यात आली असल्याचे माहिती अधिकारात उघड झाले आहे.
गजेंद्र चौहान यांनी बी.आर. चोप्रा यांच्या ‘महाभारत’ मालिकेत युधिष्ठिराची भूमिका केली होती. माहिती व प्रसारण मंत्रालयाने केवळ एका परिच्छेदाच्या माहितीवर त्यांची निवड केली आहे, त्या परिच्छेदात म्हटले आहे, की गजेंद्र चौहान हे अभिनेते आहेत व ‘महाभारत’ या मालिकेत त्यांनी युधिष्ठिराची भूमिका केली त्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. त्यांनी १५० चित्रपटांत व ६०० दूरचित्रवाणी मालिकांत काम केले आहे. एका व्यक्तीने माहिती अधिकारात केलेल्या अर्जात हा तपशील हाती आला आहे. अर्जदाराने त्यांची व्यावसायिक व शैक्षणिक माहिती मागितली होती. माहिती व प्रसारण मंत्रालयाने इतर विविध नावांची शिफारस असलेली २८१ पाने अर्जदाराला दिली असून त्यात चौहान यांच्या नावाचा एकच परिच्छेद आहे. त्या फाइलवर ज्या नोंदी आहेत, त्यात अमिताभ बच्चन, रजनीकांत, विधू चोप्रा, जाहनू बरूआ, राजू हिरानी, जया बच्चन, अदूर गोपाळकृष्णन, रमेश सिप्पी, गोविंद निहलानी, आमिर खान यांची नावे होती. ती फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट ऑफ इंडिया या संस्थेने अध्यक्षपदासाठी सुचवलेली होती.  एफटीआयआयच्या अध्यक्षपदी निवड करण्याच्या आधी त्यांचा कुठला सीव्ही (शैक्षणिक व कारकीर्दीची माहिती) सरकारने पाहिली ते मात्र सांगण्यात आलेले नाही.