तुम्ही जेव्हा एखाद्या हिंसा करणाऱ्या व्यक्तीला बघता, तेव्हा त्याला एखाद्य़ा धर्माची ओळख चिकटवण्याची चूक करता असे मत बॉलीवूड अभिनेता आमिर खान याने व्यक्त केले. तो सोमवारी दिल्ली येथे आठव्या रामनाथ गोएंका एक्सलन्स इन जर्नालिझम पुरस्कारांच्या वितरण सोहळ्यादरम्यान बोलत होता. पॅरिसमधील हल्लेखोरांमध्ये कुराण हातात असलेल्या व्यक्तीचा समावेश असूनही इस्लामचा थेट संबंध दहशतवादाशी जोडणे योग्य नसल्याचे तुला का वाटते, असा प्रश्न आमिर खानला यावेळी विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना आमिरने सांगितले की, हातात कुराण घेऊन इतरांना मारणाऱ्या त्या व्यक्तीला स्वत:ला तो मुस्लिम आहे असे वाटत असेल, पण तसे नाही. तो फक्त दहशतवादी आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या हिंसा करणाऱ्या व्यक्तीला पाहता तेव्हा, तुम्ही सर्वात पहिली चूक कोणती करत असाल तर ती म्हणजे त्या व्यक्तीला मुस्लिम दहशतवादी किंवा हिंदू दहशतवादी अशी ओळख चिकटवता. एखाद्या दहशतवाद्याला अशाप्रकारची ओळख चिकटवणे चुकीचे असल्याचे आमिरने यावेळी सांगितले.
गेल्या काही दिवसांत देशभरात गाजत असलेल्या असहिष्णुतेच्या वादाबद्दल बोलताना आमिरने त्याच्या बायकोबरील संभाषणातील एक आठवण सांगितली. मी आणि माझी बायको किरण एकमेकांशी बोलत असताना तिने मला भारताबाहेर निघून जाण्याचा विचार बोलून दाखवला. किरण पहिल्यांदाच भारताबाहेर निघून जाण्याची भाषा करत होती. तिला तिच्या मुलांच्या भविष्याची काळजी वाटत होती, असे आमिरने सांगितले.
यावेळी आमिरने असहिष्णुतेच्या मुद्द्यावरून सुरू असलेली आंदोलने आणि सेन्सॉर बोर्डाचा वादग्रस्त निर्णय आदी मुद्द्यांवरही भाष्य केले.