धक्कादायक: प्रसुतीगृहाकडे जात असताना कार पेटली; गर्भवती महिला आणि पती जळून ठार |A pregnant woman and her husband were burnt alive in Kannur Kerala as their car caught fire | Loksatta

धक्कादायक: प्रसुतीगृहाकडे जात असताना कार पेटली; गर्भवती महिला आणि पती जळून ठार

एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या होत्या तिला कारने दवाखान्यात नेत असताना कारने पेट घेतला.

Car Fire In Kannur Kerala
वाचा सविस्तर बातमी काय घडली घटना?

एक गर्भवती महिला आपल्या पतीसह कारमधून जात असताना त्या कारने पेट घेतला. या घटनेत या गर्भवती महिलेचा आणि तिच्या पतीचा मृत्यू झाला आहे. केरळमधल्या कन्नूरमध्ये ही धक्कादायक घटना घटली आहे. हे दोघेजण कारमधून जात असताना या कारने अचानक पेट घेतला. त्यात या दोघांचाही मृत्यू झाला आहे. ANI या वृत्तसंस्थेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.

काय घडली घटना?

केरळमधल्या कन्नूर मध्ये एका महिलेला प्रसुती वेदना सुरु झाल्या. त्यामुळे या महिलेला कारमधून रूग्णालयात नेलं जात होतं. त्याचवेळी कारला अचानक आग लागली. या घटनेत गर्भवती महिला आणि तिच्या पतीचा जळून मृत्य झाला आहे. कार जळताना पाहून प्रत्यक्षदर्शींनी अग्निशमन दलाला बोलावलं. अग्निशमन दल घटनास्थळी दाखलही झालं आणि त्यांनी कारला लागलेली आग आटोक्यात आणली. मात्र ड्रायव्हर सीट आणि त्याशेजारच्या सीटवर बसलेले हे पती पत्नी वाचू शकले नाहीत. रिशा (वय-२६) तिचा पती प्रजित (वय-३५) अशी मृत दोघांची नावं आहेत. कारमधून सुखरुप बाहेर पडलेल्या चौघांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

पोलिसांनी या आगीबाबत काय सांगितलं?

कन्नूर शहर पोलीस आयुक्त अजित कुमार यांनी या अपघाताची माहिती दिली. तसंच त्यांनी हे सांगितलं की वाचलेल्या चार जणांना फार गंभीर दुखापत झालेली नाही. या प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे. कारला आग नेमकी कशी लागली त्याचं कारण शोधलं जाणार आहे.कारला आग लागल्यानंतर कार जळून खाक झाली असं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं. आम्ही त्यांना वाचवण्यासाठी काहीही करू शकलो नाही. कारण कारच्या पेट्रोल टाकीचा कधीही स्फोट होऊ शकतो असं प्रत्यक्षदर्शी म्हणाले होते असंही कुमाार यांनी सांगितलं.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 03-02-2023 at 11:42 IST
Next Story
Pakistani Drone: पाकिस्तानी ड्रोनची भारतीय हद्दीत घुसखोरी; BSF च्या हल्ल्यात कोसळलं!