नवी दिल्ली : केंद्रातील नव्या सरकारच्या स्थापनेनंतर भाजपमध्ये मोठे संघटनात्मक बदल केले जाणार आहेत. विद्यामान पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांची मुदत महिनाअखेरीस ३० जून रोजी संपत असून त्यांच्या जागी आक्रमक नेत्याची निवड केली जाऊ शकते. मोदी-शहांचे विश्वासू भूपेंद्र यादव, धर्मेंद्र प्रधान, सुनील बन्सल यांच्यासह मनोहरलाल खट्टर तसेच शिवराजसिंह चौहान यांच्या नावांचाही विचार केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘चारसो पार’चा नारा दिला होता. पण संघटनात्मक शैथिल्यामुळे पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसल्याचे मानले जात आहे. त्यामुळे पक्ष संघटनेमध्ये मोदी-शहांकडून भाकरी फिरवली जाणार आहे. यादव व प्रधान यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले गेल्यास सुनील बन्सल यांच्यासारख्या संघटनेमध्ये मुरलेल्या नेत्याकडे पक्षाध्यक्षपद सोपवले जाऊ शकते असे सूत्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा >>>‘रालोआ’मध्ये दबावाचे राजकारण सुरू; ‘अग्निवीर योजना’ मागे घेण्याची संयुक्त जनता दलाची मागणी

भाजपच्या पक्षाध्यक्षपदी हरियाणाचे माजी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर वा शिवराजसिंह चौहान यांचाही विचार केला जाऊ शकतो, असे सांगितले जाते. भाजपला जेमतेम २४० जागा मिळाल्यामुळे संघटनेमध्ये नवी ऊर्जा निर्माण करू शकेल अशा नेत्याकडे सर्वोच्च जबाबदारी दिली जाईल. त्यामुळे खट्टरांची संधी हुकण्याची शक्यता पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

नड्डा मंत्री की सभागृह नेते?

नड्डा यांना पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले जाऊ शकते. पक्षाध्यक्ष होण्याआधी नड्डा यांनी केंद्रीय आरोग्यमंत्रीपद सांभाळले होते. राज्यसभेचे नेते पीयूष गोयल तसेच धर्मेंद्र प्रधान, मनसुख मंडाविया, भूपेंद्र यादव, नारायण राणे असे ज्येष्ठ नेतेही लोकसभेचे सदस्य असतील. त्यामुळे वरिष्ठ सभागृहात नेतेपदाची जबाबदारी नड्डा यांच्याकडे सोपवली जाऊ शकते. राजस्थान, हरियाणा, उत्तर प्रदेश या महत्त्वाच्या राज्यांमध्ये भाजपने जागा गमावल्याने इथेही बदलाची शक्यता आहे.