Crime News : एका सेप्टिक टँकमध्ये आढळून आलेल्या कवटीने सहा महिन्यांपूर्वी झालेल्या हत्येचं गूढ उकललं आहे. प्रेम, लग्न, नशा आणि धोका यांच्या कड्या जुळत गेल्या आणि एका हत्येचं गूढ उकललं आहे. ही घटना मध्य प्रदेशातल्या सागर जिल्ह्यातील देओरीची आहे. २२ वर्षांचा एक तरुण बेपत्ता झाला होता आता त्याची कवटी सापडली आहे.
नेमकी घटना काय घडली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रिन्स वाल्मिकी नावाच्या तरुणाची ओळख तुलसी नावाच्या मुलीशी झाली. सागर जिल्ह्यात या राहणाऱ्या या दोघांची ओळख सोशल मीडियावरुन झाली होती. या दोघांमध्ये चर्चा सुरु झाली, त्यानंतर हे दोघंही भेटले. दोघांची मैत्री झाली, दोघं एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नही केलं. मात्र लग्नानंतर काही आठवड्यांमध्येच त्यांच्या नात्यात खटके उडू लागले.
तुलसी आणि प्रिन्सच्या लग्नानंतर नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तुलसी आणि प्रिन्स यांच्या लग्नानंतर काही दिवस खूप चांगले गेले. त्यानंतर दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरुन भांडणं आणि वाद होऊ लागले. घरात वाद होऊ लागल्याने दोघंही तुलसीच्या माहेरी राहू लागले. इथूनच गोष्टी टोकाच्या बदलल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तुलसीचे शोएब नावाच्या तरुणाशी लग्नापूर्वी प्रेमसंबंध होते जे लग्नानंतरही कायम राहिले होते. याच कारणावरुन दोघांमध्ये वाद होऊ लागले होते आणि टोकाला गेले होते. शोएबने आधी प्रिन्सशी मैत्री केली. शोएबला स्मॅकचं व्यसन होतं, त्याने हळू हळू प्रिन्सलाही ती सवय लावली. त्याच दरम्यान शोएब आणि तुलसी लपून छपून भेटत होते. या गोष्टीची माहिती जेव्हा प्रिन्सला मिळाली तेव्हा तुलसी आणि प्रिन्समध्ये वाद वाढले.
२० ऑगस्टला काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २० ऑगस्टला शोएबने प्रिन्सला नशेत असताना ड्रग्ज दिले, त्यानंतर त्याची हत्या केली. हत्येचे पुरावे लवपण्यासाठी त्याने प्रिन्सचं प्रेत त्याच्या घराच्या मागे असलेल्या सेप्टिक टँकमध्ये फेकलं. त्यावर कचरा टाकला. प्रिन्सचा मृतदेह लवकर सडावा म्हणून त्यावर मीठही टाकलं होतं. दुसरीकडे प्रिन्स बेपत्ता झाल्याने त्याच्या कुटुंबाने त्याचा शोध सुरु केला होता.
सहा महिन्यांनी प्रिन्सच्या हत्येचं गूढ कसं उकललं?
प्रिन्सचा काहीही शोध लागत नसल्याने त्याच्या कुटुंबाने तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. पोलीस प्रिन्सचा शोध घेत होते. त्याचं मोबाइल लोकेशन, टेक्निकल सर्विलन्स, कुटुंबाने दिलेल्या तक्रारी या सगळ्यानंतर पोलीस शोएबपर्यंतही पोहचले. शोएबला जेव्हा अटक करण्यात आली तेव्हा त्याच्या घराजवळ खोदकाम करण्यात आलं. सेप्टिक टँकमध्ये पोलिसांना कवटी आणि काही हाडं आढळून आली. पोलिसांनी ही कवटी आणि हाडं DNA चाचणी साठी पाठवली आहेत. दरम्यान शोएबला पोलिसांनी अटक केली असून त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरु आहे. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे.
