आई, वडिलांकडून वारंवार होणाऱ्या त्रासामुळे मुलानेच आपल्या कुटुंबाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 19 वर्षीय मुलाने हत्या केल्यानंतर चोरी झाल्याचा बनाव करत शेजारी आणि पोलिसांना फसवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस तपासात त्यानेच आपल्या आई, वडिल आणि बहिणीची हत्या केल्याचं उघड झालं. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

19 वर्षीय सूरज वर्मा याला पोलिसांनी अटक केली आहे. आई-वडिलांकडून अभ्यास न केल्याबद्दल तसंच कॉलेजात न जाण्यावरुन सारखा ओरडा मिळत होता. आपण याच गोष्टीला कंटाळून त्यांची हत्या केल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं आहे. 15 ऑगस्टला पतंग उडवण्यात वेळ घालवण्यावरुनही त्याला ओरडा पडला होता.

वाद झाल्यानंतर वडिल मिथिलेश वर्मा यांनी सूरजला मारहाण केली होती. यानंतर त्याने आपल्या कुटुंबाला धडा शिकवण्याचा निर्णय घेतला असं पोलिसांनी सांगितलं आहे. मंगळवारी सूरज आपल्या मित्रांसोबत बाहेर गेला होता. यावेळी घरी परतताना त्याने सोबत चाकू आणि कैची आणली. त्या संध्याकाळी त्याने संपूर्ण वेळ कुटुंबासोबत घालवला. मध्यरात्रीपर्यंत अल्बममध्ये कुटुंबीयांसोबत असलेले फोटो तो पाहत होता.

पहाटे तीन वाजता सूरज उठला आणि थेट आई-वडिलांच्या खोलीत शिरला. त्याने आधी आपल्या 44 वर्षीय वडिलांच्या छाती आणि पोटात चाकूने वार केले. आवाज ऐकून आई जागी झाली आणि आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. पण सुरजने त्यांच्यावरही वार करत हत्या केली. यानंतर तो आपल्या 15 वर्षीय बहिणीच्या खोलीत गेला आणि तिच्या गळ्यावर वार केला. त्याची आई जिवंत होती आणि आपल्या मुलीला वाचवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र सूरजने एकामागोमाग एक वार करत त्यांची हत्या केली.

गुन्हा लपवण्यासाठी सूरजने घरातील सामान पसरवून ठेवले. तसंच हत्येसाठी वापरलेल्या चाकूवरील डाग मिटवले. दोन तासांनी त्याने शेजाऱ्यांना आवाज देत आपल्या कुटुंबाची हत्या झाली असल्याचं सांगितलं. सूरज चोरी झाल्याचा दावा करत असला तरी घरातील मौल्यवान वस्तू चोरी गेलेल्या नसल्याने पोलिसांना संशय आला. तसंच चोरांनी फक्त सूरजला का सोडलं हा प्रश्नही संशय बळावत होता.

फॉरेन्सिक टीमने तपासणी केली असता सूरजने बाथरुममध्ये आपल्या पायावरचे आणि चाकूवरचे रक्ताचे डाग स्वच्छ करण्याचा प्रयत्न केल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी सूरजने आपलं अपहरण झाल्याचा बनाव केला होता. मात्र त्यावेळीही तो पकडला गेला होता.