प्रसिद्ध हरियाणवी गायक आणि युट्यूबर अंकित बालियान हत्या प्रकरणाचा तपास जसा पुढे सरकतोय तसे या प्रकरणात नवे खुलासे होत आहेत. आता ही बाब समोर आली आहे की अंकित बालियानवर १२ गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. त्यातल्या काही गोळ्या अंकितला लागल्या. तसंच या हल्लेखोरांनी दहशत पसरवण्यासाठी हवेतही फायरिंग केलं होतं. या हत्येमागे गाण्याचंही कनेक्शन असल्याची बाब समोर आली. भरी कोर्ट में गोली मारेंगे जान या गाण्याला पाच कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले होते.
अंकितच्या हत्येसाठी गाणं का ठरलं कारणीभूत?
अंकित बालियान “भरी कोर्ट में गोली मारेंगे मेरी जान” या गाण्यात दिसला होता. या गाण्याचे शब्द २०२१ मध्ये दिल्लीतील न्यायालयाच्या आवारात झालेल्या गोगी गँगचा म्होरक्या जितेंद्र गोगीच्या हत्येची खिल्ली उडवणारे असल्याचा गँगच्या सदस्यांना संशय होता. जितेंद्र गोगीची हत्या त्याचा कट्टर प्रतिस्पर्धी टिल्लू ताजपुरियाने केली होती. बलियानने प्रतिस्पर्धी टिल्लू गँगच्या संगनमताने हे गाणे प्रसिद्ध केल्याचा आरोपही गोगी गँगने केला होता. २०२२-२३ मध्ये दिल्लीमध्ये असताना गायकाला या गँगकडून कथितरित्या धमक्या देण्यात आल्या होत्या. त्यावेळी बालियानने पोलिसांना सांगितले होते की, त्याने केवळ गाण्याच्या व्हिडिओमध्ये अभिनय केला असून गाण्याचे बोल लिहिण्यात किंवा संगीत तयार करण्यात त्याचा कोणताही सहभाग नव्हता. मात्र, गँगचा त्याच्यावरील संशय कायम राहिला अशी माहिती पोलिसांनी दिली होती.
नेमकं काय घडलं?
२६ ऑगस्टच्या संध्याकाळी शामलीच्या कोतवाली परिसरातील जिममधून बाहेर पडत असताना अंकित बालियानवर गोळीबार करण्यात आला. यात त्याचा मृत्यू झाला. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, बालियानने या धमक्यांबाबत आपल्या कुटुंबीयांना सांगितले नव्हते किंवा पोलिसांकडेही तक्रार केली नव्हती. शामलीचे पोलीस अधीक्षक नरेंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले, “अंकित बालियान ‘कोर्ट में गोली’ या गाण्यात दिसला होता. टिल्लूही अंकित यांची घट्ट मैत्री होती, हे गाणे त्यांचा अपमान आणि त्यांना चिथावणी देण्यासाठी बनवण्यात आल्याचा गोगी गँगच्या सदस्यांना संशय होता.” सोमवारी पोलिसांनी शामलीमध्ये झालेल्या चकमकीत बालियानवर गोळीबार करणाऱ्या चार आरोपींपैकी दोघांना ठार केले. उर्वरित दोन आरोपी, आरोपींना आश्रय देणारे आणि या कटात सहभागी असल्याचा संशय असलेल्या इतर व्यक्तींना अटक करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सिंह यांनी सांगितलं.
अंकित बालियानची हत्या कशी करण्यात आली?
पोलिसांनी सांगितले की, रुग्णालयात नेत असताना दोन्ही आरोपींनी त्यांना हरियाणातील गँगस्टर राहुल ऊर्फ भोलू शाहपुरिया याच्या आदेशावरून हत्या करण्यासाठी पाठवण्यात आल्याची माहिती दिली. राहुल हा कथितरित्या गोगी गँगचा सदस्य आहे. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, राहुलने या दोघांना शामलीला जाऊन आणखी दोन जणांना भेटण्यास सांगितले होते. त्याने त्यांना पैसे आणि शस्त्रे दिली होती आणि बालियानची हत्या करण्याचे आदेश दिले होते. तपासात असे समोर आले की, चारही संशयितांनी हल्ल्यापूर्वी २० ऑगस्ट रोजी शामलीला भेट देऊन परिसराची पाहणी केली होती. या काळात ते शामलीतील एका हॉटेलमध्ये थांबले होते. हत्येनंतर चौघेही तातडीने शामलीतून फरार झाले. त्यापैकी दोघे बागपतकडे, तर अन्य दोघे कर्नालच्या दिशेने गेल्याचे पोलिसांनी सांगितले.२६-२७ ऑगस्टच्या रात्री एका इन्स्टाग्राम अकाउंटवरून गोगी गँगने बालियानच्या हत्येची जबाबदारी स्वीकारल्याचा दावा करणारी सोशल मीडिया पोस्ट समोर आली होती.
